ETV Bharat / state

भारतीय क्रिकेट संघाचा अभिनंदनाचा ठराव मंजूर; सर्व खेळाडूंना प्रशस्ती पत्र पाठवणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय क्रिकेट संघानं केलेला कामगिरीबद्दल एकमतानं अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आलाय.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 10, 2025 at 1:38 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये रविवारी (दि.9) झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामान्यात भारतीय संघानं आपलं वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतानं तीन वेळा चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केलाय. काल भारतीय संघानं न्यूझीलंडला चार विकेट्सनं पराभव केल्यानंतर देशात मोठा जल्लोष साजरा करण्यात येतोय. खेळाडूंनीही सेलिब्रेशन केलंय. दरम्यान, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय क्रिकेट संघानं केलेला कामगिरीबद्दल एकमतानं अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आलाय.

मुख्यमंत्र्यांकडून संघाचं कौतुक : दरम्यान, विधानसभेत आज सकाळी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करत अभिनंदन केलं. "भारतीय क्रिकेट संघ हा तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव संघ ठरलाय. कालची मॅच जर आपण पाहिली तर या मॅचमध्ये सर्व खेळाडूंनी सांघिक कामगिरी केलीय. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या परफॉर्मन्सवर काहीजण टीका करत होते. फॉर्म हा टेम्पररी असतो, पण क्लास हा कायम असतो", असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्मा, विराट कोहली यांचं कौतुक केलंय.

आपल्या पद्धतीनं स्वागत करूया : याचबरोबर, वरूण चक्रवती, कुलदीप यादव तसंच अन्य खेळाडूंचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. तसंच, "1983 रोजी आपण पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. तेव्हापासून भारतीय क्रिकेटला एक वेगळी दिशा मिळालीय. यानंतर आपण अनेक आयसीसी स्पर्धा जिंकलो आहोत. भारतीय संघ लवकरच देशात येणार आहे. तेव्हा आपण आपल्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करूया. भारतीय क्रिकेट संघानं अभूतपूर्व कामगिरी करत तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळं कालची मॅच नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

प्रशस्ती पत्र पाठवणार : "या संघानं सर्व जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलंय. तसंच या संघावर कौतुकाचा वर्षाव होतोय. एका परदेशी समालोचकानं भारतीय संघाचं वर्णन करताना म्हटलं की, जर भारतीय संघ ए टीम आणि बी टीम स्पर्धेत ठेवली तर या दोन्ही टीम फायनला येतील", असा किस्सा ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला. तसंच "आपण या संघाचं अभिनंदन करूया आणि यांचं कौतुक म्हणून मी आज सभागृहाच्या पटलावर एक ठरावचा प्रस्ताव मांडतोय. भारती क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना सरकारच्यावतीनं आपण एक प्रशस्ती पत्र पाठवण्याचा ठराव मी मांडतोय", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले . दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मांडल्यानंतर अध्यक्षांनी या ठरावाला कुणाचा आक्षेप असेल तर बोलावं असं सांगितलं. मात्र, याला कोणीही आक्षेप घेतला नाही. त्यामुळं हा ठराव अध्यक्षांनी एकमतानं मंजूर केला.

हेही वाचा-

  1. शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "मी काँग्रेसमध्येच..."
  2. "धंगेकर संपलेला नाही, कसब्यात अजूनही 'हू इज धंगेकर' सुरूच"; पाहा व्हिडिओ
  3. चर्चा अखेर खरी ठरली! काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज शिवसेनेत करणार पक्षप्रवेश