मुंबई - छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकेला झालेला विलंब हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबईत केली. ते विधानभवनात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह बोलणाऱ्या आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मालमत्तेवर बुलडोजर फिरवा, अशी मागणी मिटकरी यांनी केली. कोरटकरला तेलंगणामध्ये पकडले. या प्रकरणात आपला राज्य सरकारच्या गृहखात्यावर कोणताही आक्षेप नाही. तसेच देवेंद्र फडणवीसांवर या प्रकरणाचे खापर फोडणंदेखील चुकीचं आहे. मात्र, नागपूर पोलिसातील काही जणांवर आपला संशय आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीची आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे मिटकरी म्हणाले.
कोरटकरला सोमवारी तेलंगणामध्ये अटक करण्यात आली. या अटकेला विलंब झाला. या विलंबाला नागपूर पोलीस जबाबदार आहेत. नागपुर पोलिसांमधील काही जणांचे कोरटकरसोबत आर्थिक संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही-राष्ट्रवादी आमदार, अमोल मिटकरी
राहुल सोलापुरकरवर गुन्हा दाखल करावा- कोरटकरला चंद्रपूरमध्ये कोण भेटले? कोणते पोलीस अधिकारी भेटले? त्या सर्वांची चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. कोरटकर हा गडचिरोली सिरोंचा मार्गेच तेलंगणाला गेला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. आता त्याला अटक केली आहे, तर किमान त्याला जामीन मिळणार नाही, याची काळजी घेण्याची गरज अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. कोरटकरप्रमाणेच छत्रपती शिवरायांबद्दल शिवराळ बोलणाऱ्या राहुल सोलापुरकरवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
पोलीस सहकार्याशिवाय घडू शकत नाहीत-कोरटकर किंवा सोलापुरकर हे एकवेळ सरकार पोलीस नजरेतुन बचावतील. मात्र, ते ज्या वेळी रस्त्यावर दिसतील, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरप्रेमी, शिवप्रेमी आणि नागरिक या दोघांच्या चेहऱ्याला काळे फासतील, अशा इशारा त्यांनी दिला. कोरटकर हा पोलिसांच्या नाकावर टिच्चून गेला. पोलीस सहकार्याशिवाय असे घडू शकत नाही, असा अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केला.
हेही वाचा-