ETV Bharat / state

एमजीएम विद्यापीठात चंद्रग्रहणाचा अद्भुत अनुभव; ग्रहण काळात अन्न सेवन करून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम विद्यापीठात विशेष दुर्बिणी आणि आधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं चंद्रग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी खगोलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

Astronomer Srinivas Aundhkar
खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 8, 2025 at 7:24 AM IST

|

Updated : September 8, 2025 at 10:58 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठाच्या विज्ञान विभागात रविवारी (7 सप्टेंबर) रात्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खगोलप्रेमी विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांनी चंद्रग्रहणाचं निरीक्षण केलं. विज्ञान विभागामार्फत विशेष दूरबिणी आणि आधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं चंद्रग्रहण अभ्यासाची व्यवस्था करण्यात आली होती.

ग्रहणाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी चंद्रग्रहणाचे विविध टप्पे प्रत्यक्ष पाहिले. त्यामागील शास्त्रीय कारणं समजून घेतली. मात्र, रात्री 11 वाजल्यानंतर आकाशात ढग दाटल्यानं पूर्ण खग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळाली नाही. तरीसुद्धा अंशतः ग्रहणाचं निरीक्षण करणं हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला, अशी माहिती खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

एमजीएम विद्यापीठात चंद्रग्रहणाचा अद्भुत अनुभव (ETV Bharat)

आकाशात ढग दाटल्यानं खगोलप्रेमींचा हिरमोड : दरम्यान, या कार्यक्रमाच्या वेळी विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या परस्पर हालचालीमुळे चंद्रग्रहण कसं घडतं याचं प्रत्यक्ष दाखल्यांसह शास्त्रीय स्पष्टीकरण दिलं. पौर्णिमेच्या रात्री 9.58 वाजता ग्रहणास सुरुवात झाली. साधारणतः मध्यरात्री 1.45 वाजेपर्यंत खग्रास चंद्रग्रहण अनुभवता येणार होते. निम्म्या पृथ्वीवर हे दुर्मीळ खग्रास ग्रहण पाहता येत होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रारंभी जवळपास एका तासापर्यंत खगोलप्रेमींना ग्रहण पाहण्याचा अनुभव घेता आला. मात्र, 11 वाजल्यानंतर आकाशात ढग दाटल्यानं चंद्र पूर्णपणे झाकल्याचा क्षण प्रत्यक्ष पाहता आला नाही. त्यामुळे उपस्थित खगोलप्रेमींचा हिरमोड झाला. डॉ. औंधकर यांनी सांगितलं की, जरी स्थानिक वातावरणामुळे ग्रहण संपूर्णपणे पाहता आलं नसलं, तरीही ही घटना जगभरातील शास्त्रज्ञांकडून अभ्यासली जात आहे.

Lunar Eclipse
चंद्रग्रहण पाहताना खगोलप्रेमी (ETV Bharat)

चंद्रग्रहण काळात अन्न सेवन करून अंधश्रद्धेबाबतची भीती दूर करण्याचा प्रयत्न चंद्रग्रहण निरीक्षण कार्यक्रमात खगोलप्रेमींचा मोठ्या संख्येनं सहभाग पाहायला मिळाला. या वेळी खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर आणि एमजीएममधील खगोल अभ्यासकांनी उपस्थितांना ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धांबाबत जागरूक केले. ग्रहणकाळात अन्न सेवन करणं अपवित्र मानलं जातं ही चुकीची समजूत दूर करण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. त्याअंतर्गत उपस्थितांनी एकत्र येऊन बिस्किटं आणि चॉकलेट्स खाल्ले. या कृतीतून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी, युवक आणि नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते. प्रारंभीच्या ग्रहण दृश्यांचा अनुभव घेताना परिसरात उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण होतं. आकाशाकडे लक्ष केंद्रित करत उपस्थितांनी या दुर्मीळ खगोलीय घटनेचा अभ्यासपूर्ण अनुभव घेतला.

Astronomer Srinivas Aundhkar
खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर (ETV Bharat)

हेही वाचा

Last Updated : September 8, 2025 at 10:58 AM IST