पुणे : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला असून, दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. यातील दोन पर्यटक हे पुण्याचे असून, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा यात मृत्यू झालाय. आज पहाटे साडे चार वाजता पुणे विमानतळावर संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव दाखल झालं. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, क्रीडामंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार : पहाटे पुणे विमानतळावर संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव दाखल झालं होतं. यानंतर दोघांचंही पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं. तिथं विविध राजकीय पक्षाचे नेते तसेच सामाजिक संघटना आणि नागरिकांनी अंत्यदर्शन घेतलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, मनसे नेते बाळा नांदगावक तसंच विविध पक्ष, संघटनेचे नेते उपस्थित होते. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात रोष : कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोघांवर भावपूर्ण वातावरणात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात रोष पाहायला मिळाला. यावेळी 'पाकिस्तान मुर्दाबाद' तसेच 'जलादो जलादो पाकिस्तान जलादो'च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
कौस्तुभ गणबोटे यांच्या मित्रांना शोक अनावर : "आमचे मित्र गेले याचं दुःख न भरून येणारं आहे. या पाकिस्तानला योग्य पद्धतीने धडा शिकवावा. या भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन दिलं पाहिजे. काश्मीरला जाण्यापूर्वी राहत्या घराबाजूला त्यांच्या फेमस असणाऱ्या 'गणबोटे फरसाण हाऊस' या नावाचा बोर्ड लावला होता. हा बोर्ड लावल्यानंतर खूप कौतुकाने त्यांच्याशी बोलणं झालं होतं. खूप छान बोर्ड आहे असं म्हणताच त्यांच्या हसण्याने समाधान वाटलं होतं. तेच शेवटचं बोलणं असेल असं कधीच वाटलं नाही," अशी आठवण कौस्तुभ यांच्या एका मित्रानं सांगितली.
आमचा आधारच गेला : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करत गोळीबार केला, या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय. यातील दोन पर्यटक हे पुण्याचे असून, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा यात मृत्यू झालाय. पुण्यातील रास्ता पेठ येथे कौस्तुभ गणबोटे राहत होते, तर कर्वेनगर येथे संतोष जगदाळे राहायला होते. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगरा कोसळलाय. "कौस्तुभ जाण्याच्या आधी मला येऊन भेटला होता आणि त्यानं सांगितलं होतं की, मित्रांसोबत फिरायला चाललोय, तेव्हा मी बोलली होती की, जा पण काळजी घे, परंतु आता आमचा आधारच गेला आहे. तो आमच्या घरातील सर्वात मोठा होता," असं म्हणत कौस्तुभच्या काकी ज्योती गणबोटे या भावूक झाल्या होत्या.
पहलगाम हल्ल्यातील मृतांवर अंत्यसंस्कार : डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. मुलांच्या परीक्षा आटोपल्यानं ते पर्यटनासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर दहशतवाद्यांनी क्रूरपणे हल्ला केला. या हल्ल्यात संजय, हेमंत, अतुल यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी या तिघांचे मृतदेह श्रीनगर येथून मुंबईत आणण्यात आले.अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा -