
लालबागच्या राजाचे अखेर जवळपास 34 तासांनी झालं विसर्जन, कोळी बांधवांनी दिला अखेरचा निरोप
लाडक्या लालबागच्या राजाचं यंदा तब्बल जवळपास 34 तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर रविवारी रात्री साडेनऊ ंवाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं.

Published : September 7, 2025 at 6:56 PM IST
|Updated : September 7, 2025 at 10:13 PM IST
मुंबई : मुंंबईंकरांच्या लाडक्या लालबागच्या राजाचं यंदा तब्बल जवळपास 34 तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर रविवारी रात्री साडेनऊ ंवाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं. अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं शनिवारी (6 सप्टेंबर) सकाळी 10 वाजता लालबाग येथून निघालेली भव्य मिरवणूक रविवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास चौपाटीवर पोहोचली. मात्र, समुद्राला आलेली मोठी भरती आणि नव्या मोटराइज्ड तराफ्यावरील तांत्रिक अडचणींमुळं विसर्जन प्रक्रियेला विलंब झाला. यामुळं बाप्पाची मूर्ती 13 तासांहून अधिक काळ समुद्रकिनाऱ्यावर उभी राहिली. अखेर, कोळी बांधवांनी ओहोटीची वाट पाहून पारंपरिक पद्धतीनं विसर्जन पूर्ण केलं. लाखो भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणांसह पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
मिरवणुकीचा भक्तिमय सोहळा : लालबाग-परळ परिसर ढोल-ताशांच्या गजरानं, भक्तीगीतांनी आणि रंगीबेरंगी सजावटीनं गणेशमय झाला. मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेत भक्तीभावानं आरती, जयघोष आणि प्रार्थना केल्या. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीनं मुंबईच्या रस्त्यांवर एक अनोखा उत्साह निर्माण केला. यंदा प्रथमच लालबागच्या राजा मंडळानं गुजरातमध्ये तयार केलेला स्वयंचलित मोटराइज्ड तराफा वापरला. हा तराफा 360 अंशात फिरण्यास सक्षम आहे. परंतु, त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळं विसर्जनास विलंब झाला.
तांत्रिक अडचणी आणि विलंब : समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळं मोटराइज्ड तराफा अस्थिर झाला. लाटांच्या तीव्रतेमुळं हायड्रॉलिक यंत्रणेद्वारे मूर्ती तराफ्यावर चढवणं शक्य झालं नाही. बरेच तास पाण्यात थांबल्यानं, मूर्तीचा पाट जड झाला. त्यामुळं ट्रॉलीवरून मूर्ती सरकत नसल्यानं मंडळाला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळं पारंपरिक तराफ्याचा वापर करण्याचा विचार झाला. अखेर, मोठ्या प्रतीक्षेनंतर कोळी बांधवांनी आपल्या पारंपरिक कौशल्यानं मूर्तीचं विसर्जन यशस्वीपणं पूर्ण केलं. या प्रक्रियेत कोळी बांधवांनी सलामी देत बाप्पाला निरोप दिला.
सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्था : गर्दीच्या नियोजनासाठी मुंबई पोलीस आणि लालबागचा राजा मंडळानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. यंदा प्रथमच फेस डिटेक्शन प्रणालीचा वापर करून संशयित हालचालींवर लक्ष ठेवलं गेलं. मुंबई महानगरपालिकेनं विसर्जनासाठी सूचनाफलक, स्वच्छतागृह, मोठे व्यासपीठ आणि पाण्याच्या सुविधांसह इतर व्यवस्था केल्या. पाण्याची खोली आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनानं योग्य उपाययोजना केल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या नियोजनामुळे लाखो भाविकांना सुरक्षितपणे सोहळ्यात सहभागी होता आले.गिरगाव चौपाटीवरील उत्साह : गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा सम्राट, नरेपार्कचा राजा आणि तेजुकाया यांसारख्या प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक जमले. सकाळपासूनच चौपाटी भाविकांनी गजबजली होती. लालबागच्या राजाच्या विलंबामुळे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जनालाही काही वेळ थांबावे लागले. तरीही, पोलीस आणि महानगरपालिकेच्या उत्तम नियोजनामुळं हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
बाप्पाला निरोप : लालबागच्या राजाच्या विसर्जनानं मुंबईच्या गणेशोत्सवाचा समारोप झाला. पाणावलेल्या डोळ्यांनी भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशी हृदयस्पर्शी साद घालत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून, मुंबईच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं प्रतीक आहे.
भाविकांची दिलगिरी व्यक्त केली : लालबाग राजा मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांनी सांगितले की, "ओहोटी असल्याने तराफा जागेवरून हलू शकत नाही. त्यामुळे आम्ही भरतीची वाट पाहिली. समुद्राला पुन्हा भरती आल्यानंतर तराफा जागेवरून हलवला आणि त्यानंतर रात्री दहा वाजता राजाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विसर्जन केले. यात आम्हाला माध्यमांनी, महानगरपालिका प्रशासनाने आणि मुंबई पोलिसांनी देखील मोठी मदत केली आहे. आम्ही त्यांचे देखील आभार मानतो आणि भाविकांची दिलगिरी व्यक्त करतो."
हेही वाचा -

