पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 26 वा वर्धापन दिन सोहळा पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आज पुण्यनगरीत दाखल झाले होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी माध्यमाशी बोलताना अनेक विषयावर भाष्य केलं आहे.
लाडक्या बहिणीचे पैसे थकवले नाही : यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "राज्यात मद्य विक्रीचे दर वाढले आहेत असं माझ्या काही ऐकण्यात आलं नाही. मात्र, राज्य सरकारच्या तिजोरीत भर घालण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. आम्ही कधीही लाडक्या बहिणीचे पैसे थकवले नाहीत, मात्र विरोधकांनी काही कारण नसताना समाजामध्ये अशी चर्चा सुरू केली. 'गरज सरो वैद्य मरो' मात्र आम्हाला निवडणुकीत यश मिळालं म्हणून आमची गरज संपली असं काही नाही."
राज्यात पाच लाख सोलर पंप : लाडक्या बहीण योजनेसाठी आम्ही विशेष आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. मागच्या सरकारच्या काळात वीज माफी करण्यात आली आणि ती परत मागे घेण्यात आली. आम्ही असं काही करणार नाही, आम्ही राज्यात पाच लाख सोलर पंप बसवले आहेत. त्याचबरोबर आम्ही राज्यात ठीक ठिकाणी सोलर पॅनल लावून विजेची निर्मिती करत आहोत. अशी माहिती अजित पवारांनी दिली.
लक्ष्मण हाके विकृत माणूस : "जयंत पाटील काय बोलले हे मला माहीत नाही, त्यांनी त्यांचं मत काय मांडावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या व्यासपीठावर काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे. असं सांगत अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या सूचक राजीनाम्याविषयी बोलणं अप्रत्यक्षपणे टाळलं. सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य महायुतीतील नेते मंडळी करत असतील, तर त्यांना त्या पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी समज देतील असा इशारा देखील अजित पवार यांनी महायुतीतील वाचाळवीरांना दिला आहे. लक्ष्मण हाके हा विकृत माणूस आहे. त्यामुळं अशा विकृत माणसाचे प्रश्न मला कशाला विचारता असं बोलत अजित पवारांनी हाकेच्या प्रश्नावरून पत्रकारांना सुनावलं.
या कार्यकर्त्यांच्या भावना : आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम करतो. मात्र अनेक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात मात्र, या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. पक्षातील वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही घेतो असं सांगत अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर...: आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत एकच प्रभाग राहील. त्याविषयी मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येईल. मात्र, प्रभाग कितीचा राहिला तरी आपल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची मानसिकता तयार करायला पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली. आम्ही महाविकास आघाडीत असताना आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणूका 15 वर्षे एकत्र लढलो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायचं का नाही याविषयीचा निर्णय आम्ही त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर सोडला होता, असं सांगत अजित पवार यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याविषयी सूचक वक्तव्य केलं आहे.
आपलं नशीब आजमाव लागेल : आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांना वाटतं, त्यात काही चुकीचं नाही. मात्र निवडणुकीतील 145 हा आकडा महत्वाचा असतो. कधी कधी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याकरिता अशी वक्तव्य करण्यात येतात. आमच्या पक्ष स्थापनेला आल्यापासून आम्ही मुंबईमध्ये कधीही 14 चा वर आकडा महापालिका निवडणुकीत गाठला नाही. मात्र आम्हाला तिथे आपलं नशीब आजमाव लागेल, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीविषयी केलं.
हेही वाचा -