कोल्हापूर : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहूनदेखील लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीचा खून करून पळालेल्या आरोपी तरुणानं आत्महत्या केली. सतीश मारुती यादव असे आरोपीचं नाव आहे. त्यानं शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी परिसरात आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (५ जून) रोजी सकाळी निदर्शनास आला, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी दिली.
पतीसोबत पटत नसल्यानं राहत होती माहेरी : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जय भवानी गल्ली परिसरात समीक्षा ही आपली आई आणि लहान-बहीण भावासोबत राहत होती. 2018 साली समीक्षाचं लग्न लक्षतीर्थ वसाहत परिसरातील मुलासोबत झालं होतं. लग्नानंतर तीन महिन्यात नवऱ्याशी पटत नसल्यानं नवऱ्याला सोडून ती आपल्या आई, बहीण, भावासोबत कसबा बावड्यातील जय भवानी गल्ली इथं राहायला गेली.
समीक्षा आणि सतीश यांच्यात होते वाद : घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं समीक्षाची आई ही मासे विकून उदरनिर्वाह करत होती. तर समीक्षादेखील इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती. हे काम करताना तिची ओळख कोल्हापुरात कामानिमित्त आलेली तेलंगणा येथील तरुणी आयशूशी झाली. तसेच कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथं राहणारा संशयित सतीश यादव यांच्याशी ओळख झाली. या दरम्यान समीक्षा आणि सतीश दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यासाठी सतीश यादव यानं सरनोबतवाडी इथं टू बीएचके फ्लॅट घेतला. इथं गेल्या तीन महिन्यांपासून ते राहत होते. तर त्यांच्यासोबत तिची मैत्रीण आयशूदेखील राहत होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून समीक्षा आणि सतीश यांच्यात वारंवार वाद होत होता. आठ दिवसांपूर्वी या वादाला कंटाळून समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू या दोघी कसबा बावडा येथील आईच्या घरी राहण्यास गेल्या होत्या. तर संशयित आरोपी सतीश यादव हा समीक्षाला वारंवार फोन करून भेटण्यासाठी आग्रह करत होता.
समीक्षावर चाकू हल्ला करुन प्रियकर मारेकरी फरार : मंगळवारी दुपारी समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू दोघी आपलं सामान आणण्यासाठी फ्लॅटवर गेल्या. यावेळी दोघी फ्लॅटवर आल्याची माहिती सतीशला मिळताच तो फ्लॅटवर आला. रागाच्या भरात त्यानं समीक्षाला एका खोलीत नेऊन तिच्यावर चाकूनं वार केला. या हल्ल्यात समीक्षा जागेवरच कोसळली. हा हल्ला इतका भीषण होता की चाकू तरुणीच्या बरगड्यात अडकला. तर सतिश यादव यानं खोलीला बाहेरून कडी लावून दुचाकीवरून पसार झाला. गांधीनगरचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या नेतृत्वात पाच वेगवेगळ्या पथकाकडून संशयित आरोपीचा शोध सुरू होता. त्याच्या मूळ गावी शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर येथील रुमसह मित्रांकडे छापे टाकण्यात आले होते. मात्र तो सापडला नव्हता.
समीक्षाचा खून का केला? : त्याचा अधिक तपास सुरू असताना पोलिसांच्या खबऱ्यामार्फत संशयित आरोपी हा शाहूवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. मात्र, आज पोलिसांचं पथक पोहोचेपर्यंत आरोपीनं आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. तर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मलकापूर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र, सतीश यादवनं आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्यानं समीक्षाचा खून का केला? याचा पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा -
- कोल्हापुरात थरार: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीनं लग्नास दिला नकार, प्रियकरानं केला खून
- चिमुकलीवर बलात्कार करुन खून : बिहारमधील विरोधकांनी सरकारला घेरलं, वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप
- पाच वर्षात 66 हजार महिला बेपत्ता, तर दर 2 तास 13 मिनिटामध्ये एका महिलेचा खून किंवा अत्याचार