जळगाव : किरीट सोमय्यांनी जळगावमध्ये अवैधरीत्या वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशींच्या तपासणीची मागणी केलीय. जळगावमध्ये 42 बनावट दाखले आता आढळले असले तरी यापूर्वी दिलेल्या दाखल्यांची देखील चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं केलीय. जळगावमध्ये पण बांगलादेशींना बनावट नावाने प्रमाणपत्र मिळत आहेत. महापालिकेत 42 बनावट प्रमाणपत्राचा घोटाळा हा अचानक आलेला घोटाळा असूच शकत नाही. बनावट जन्म दाखले ही गंभीर बाब आहे. आम्ही महाराष्ट्राच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. बनावट जन्म प्रमाणपत्राच्या मागे मोठं षडयंत्र आहे आणि ते आम्ही शोधून काढणार. जन्म प्रमाणपत्र हे बांगलादेशींचे आहे किंवा नाही हा मुद्दा नसून त्याच्यामागे नेमकं कोण आहे? हा घोटाळा नेमका कोणी केला? आणि त्यांना बनावट प्रमाणपत्र घेण्याची गरज का पडली? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.
बनावट दाखले घेणारे 97 टक्के मुस्लिम : बनावट जन्म प्रमाणपत्र हे प्रकरण छोटे नाही, कदाचित बांगलादेशींना भारतात प्रवेश देण्यासाठी हा रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न असेल. मालेगावमध्ये बनावट प्रमाणपत्र हे बांगलादेशींना दिले गेल्याचं सिद्ध झालंय म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. जे बनावट दाखले घेतले त्यात 97 टक्के मुस्लिम आहेत ही सत्यता आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
बनावट जन्म प्रमाणपत्राचा विषय गंभीरतेने घेणार : राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना जेवढा बोंबलायचं आहे, तेवढा बोंबला द्या. फक्त मुस्लिमांनाच का विलंबित प्रमाणपत्र पाहिजेत?, थर्ड पार्टीच्या नावाने जन्म प्रमाणपत्र देण्यात आलेत. पुरावे नसतानाही अनेक तहसीलदारांनी अशा पद्धतीने जन्म प्रमाणपत्र देऊन टाकले. एखाद्या पाकिस्तानी जासूसने बनावट दाखला काढून त्याचा गैर उपयोग केला तर? जळगावमधील बनावट जन्म प्रमाणपत्राचा विषय आम्ही गंभीरतेने घेत आहोत. या प्रकरणात बांगलादेशी हस्तक्षेप दिसत नाही, असं म्हणण्याचं काम जिल्हा पोलीस अधीक्षकांचे नाही. ज्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्रात फ्रॉड केला आहे, त्यावर कारवाई करा, असंही सोमय्या म्हणालेत.
बनावट जन्म प्रमाणपत्र हा महाराष्ट्राचा प्रॉब्लेम : बांगलादेशी कोण आहे आणि त्याच्यामागे कोण आहे हे एटीएस आणि एनआयए पाहणार आहे. पोलिसांनी निर्दोष सर्टिफिकेट देण्याची घाई करण्याची गरज नाही. किरीट सोमय्या यांनी जळगाव पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर भाष्य करीत रोष व्यक्त केलाय. बनावट जन्म प्रमाणपत्र हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रॉब्लेम असल्याचंही सांगितलंय.
सर्टिफिकेट देण्याची घाई करू नये : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कोणी बांगलादेशी आहे किंवा नाही?, याचं सर्टिफिकेट देण्याची एवढी घाई करण्याची गरज नाही. जन्म प्रमाणपत्रात अनेक घोटाळे झाले आहेत, त्याच्यामागे कोण आहे? त्याचा मास्टरमाइंड कोण? हे शोधण्याची गरज आहे. या प्रकरणात वकील पकडला गेलाय, त्याचा मास्टर माईंड कोण आहे? मालेगावमध्ये ही असाच प्रकार झालेला आहे. त्यामुळं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणार आहे आणि या घटनेला गांभीर्याने घेतलं जाणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिलीय.
हेही वाचा -
- राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांचा सुळसुळाट : किरीट सोमय्या
- बांगलादेशींना दिले जन्मदाखले: मालेगावचे तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार संदीप धरणकर निलंबित
- सिल्लोडमध्ये अचानक इतके जन्म प्रमाणपत्र कसे दिले ?; बांगलादेशींना आधार कार्ड पाहून दाखले दिल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप