ETV Bharat / state

पुण्यात 1 हजार 111 हून अधिक शंखवादकांचा विश्वविक्रम! 'केशव शंखनाद' पथकाची अनोखी कला, पाहा व्हिडिओ

पुण्यात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर १ हजार १११ हून अधिक शंखवादकांनी (keshav Shankhnad) सात आवर्तनांतून शंखनाद करून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

keshav Shankhnaad Pathak
'केशव शंखनाद' पथकाचा विश्वविक्रम (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 5, 2025 at 3:23 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : पारंपरिक आणि अध्यात्मिक महत्त्व जपणाऱ्या विशेष सोहळ्यात रविवारी (5 ऑक्टोबर) पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर 'ब्रह्मनाद', 'सप्तखंड', 'अर्धवलय', 'तुतारी', 'पूर्णवलय', 'सुदर्शन' आणि 'मुक्तछंदनाद' अशी सात आवर्तनं आणि तीन मंत्र एकत्र शंखाद्वारे सादर करत तब्बल 1 हजार 111 हून अधिक शंखवादकांनी विश्वविक्रम केला आहे. या सोहळ्यात आज प्रत्यक्षात तब्बल 1 हजार 400 शंखवादक सहभागी झाले होते.

keshav Shankhnaad Pathak
पुण्यात 1 हजार 111 हून अधिक शंखवादकांचा विश्वविक्रम! ' (ETV Bharat Reporter)

स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला सोहळा : हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक अशी ओळख असलेल्या 'केशव शंखनाद' पथकाच्या वतीनं शंखवादकांचा विश्व विक्रम सोहळा स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. विश्वविक्रम सोहळ्याला राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहतास नाथ महाराज, जगदगुरुकृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शंखनाद पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या शंखनादचा विश्वविक्रम झाल्यावर वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाच्या सुषमा नार्वेकर यांनी प्रमाणपत्र प्रदान केलं.

शंख वादकांनी केला विश्वविक्रम (ETV Bharat Reporter)



छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन : आज सकाळी ठीक साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर राज्यभरातून केशव शंखनाद पथकाचे ज्येष्ठ, लहान मुले, महिला तसंच तरुण वादक सहभागी झाले होते. या वादकांकडून प्रथम 'ब्रह्मनाद' या नादातून मानवी जीवन आणि परमात्मा यांच्यातील नात्याची आध्यात्मिक जोड दर्शवण्यात आली. त्यानंतर 'सप्तखंड नाद' आणि 'अर्धवलय' नादांचे सादरीकरण झाले. अर्धवलय नाद पृथ्वीच्या पाताळातील भागाचे प्रतिनिधित्व करतो. 'तुतारी नाद' या चौथ्या आवर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. पाचवे 'पूर्णवलय' आणि सहावे 'सुदर्शन' आवर्तनांनंतर, सातवे 'मुक्तछंदनाद' आवर्तन मुक्त नादाच्या रूपात सादर झाले. सातही नादांच्या माध्यमातून पृथ्वीवरील सात खंड, पाताळातील अर्धा भाग आणि आध्यात्मिक एकात्मतेचे दर्शन उपस्थितांना झाले.

keshav Shankhnaad Pathak
केशव शंखनाद पथकाच्या वतीने शंखवादकांचा विश्व विक्रम (ETV Bharat Reporter)


वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये झाली नोंद : याबाबत केशव शंखनाद पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन म्हणाले की, "संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 जयंती वर्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन 375 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 351 वर्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकराचे 300 वर्ष, जयंती महात्मा जोतिबा फुले यांच्या 135 पुण्यतिथी वर्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष सोहळा, यानिमित्तानं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या विश्वविक्रमाची नोंद झाली. याकरिता मागील 1 वर्षापासून तयारी सुरु होती. शंखवादक पुणे महानगर आणि महाराष्ट्र राज्यभरातून आले होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा विश्वविक्रम करण्यात आला आहे."


keshav Shankhnaad Pathak
केशव शंखनाद पथकाच्या वतीने शंखवादकांचा विश्व विक्रम (ETV Bharat Reporter)

हेही वाचा -

  1. पुण्यातील गणपती मिरवणुकीत शंखनाद, पाहा व्हिडिओ
  2. अभिमानास्पद! प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पुण्यातील शंखनाद पथकाला निमंत्रण
  3. 500हून अधिक कलाकारांच्या माध्यमातून शंखनाद करत बाप्पाला निरोप, पहा व्हिडिओ - pune ganpati visarjan 2024