मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या प्रकरणात वांद्रे न्यायालयानं करुणा शर्मा यांच्या बाजूनं निर्णय दिला होता. हा निकाल माझगाव न्यायालयानं कायम ठेवला आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर आज ( शनिवारी) माझगाव न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं दिला होता. त्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावरची सुनावणी शनिवारी पार पडली. या याचिकेवर निर्णय देताना माझगाव न्यायालयानं धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे हा धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
लग्न झाल्याचे पुरावे न्यायालयात सादर-करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. कौटुंबिक न्यायालयानं दोन लाख रुपये पोटगी दरमहा देण्याचे माजी मंत्री धनंजय मुंडेंना निर्देश दिले होते. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून पंधरा लाख रुपये पोटगी मिळावी, अशी याचिका केली होती. याचिकेच्या सुनावणीदरम्यान करुणा शर्मा यांच्यातर्फे लग्न झाल्याचे पुरावे सादर करण्यात आले. मात्र, ते पुरावे धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून फेटाळण्यात आले. करुणा शर्मा यांच्यातर्फे देण्यात आलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वतीनं करण्यात आला.
अंतिम इच्छा पत्र न्यायालयासमोर सादर- आपल्याला प्रेमात अडकवून आपल्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते, असा दावा करुणा शर्मा यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यासोबत माझे लग्न मंदिरात झाले होते. त्या लग्नाला आमच्याकडून काही आणि त्यांच्याकडून काही लोक उपस्थित होते, असे करुणा शर्मा यांच्यातर्फे सांगण्यात आलं. धनंजय मुंडे यांचे लग्न करुणा शर्मा यांच्यासोबत झाल्याचा पुरावा देण्याचे निर्देश न्यायालयानं करुणा यांना दिले होते. त्यानुसार करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छा पत्र न्यायालयासमोर सादर केलं.
हेही वाचा-