ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची वास्तू पुढच्या काही दिवसांत पाडण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या वास्तूमधील जुन्या आठवणी कायमस्वरूपी मनात साठवण्यासाठी "नव्या वास्तूत जुन्या आठवणींचा प्रवास" या भावनिक कार्यक्रमाचं आयोजन रुग्णालयात करण्यात आलं होतं.
अद्ययावत आणि भव्य मनोरुग्णालय उभारण्यात येणार : १९०१ मध्ये स्थापन झालेलं आणि ठाण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेलं हे रुग्णालय सुमारे ७२ एकर परिसरात पसरलेलं असून सध्या १८५० खाटांची क्षमता आहे. मात्र आता याच ठिकाणी बंगळूरच्या NIMHANS धर्तीवर भारतातील एक अद्ययावत आणि भव्य मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे. नव्या रुग्णालयात एकूण ३२७८ खाटा, वैद्यकीय अधिकारी, तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निवास, रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र, मुलांसाठी स्वतंत्र विभाग, ईसीटी, व्यवसाय उपचार, न्यूरोलॉजी विभाग, सर्जरी यांसारख्या आधुनिक सुविधा असणार आहेत.
रुग्णालयाची चित्रफित देखील दाखवण्यात आली : "नव्या रुग्णालयाबद्दल उत्साह असला, तरी ज्यांनी दशकभर या जुन्या वास्तूंमध्ये काम केलं, त्यांच्यासाठी हे क्षण भावनिक होते. कार्यक्रमात अनेकांचे डोळे पाणावले. वास्तू पाडल्या जात असल्या, तरी त्यातील आठवणी कायम जपल्या जातील", असं मत रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयाची चित्रफित देखील दाखवण्यात आली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्यासह आजी माजी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोरुग्णालय १९०१ मध्ये सुरू करण्यात आलं होतं : राज्य शासन लवकरच नव्या इमारतींचं बांधकाम सुरू करणार आहे. मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि महापालिकेला विकासासाठी दिल्या आहेत, मात्र उरलेल्या भागात रुग्णालयाचा आधुनिकतेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. या ठिकाणी १८९५ सालची कोनशिला असून, मनोरुग्णालय १९०१ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. पुढे मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, नाशिक, धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यासाठी हे मनोरुग्णालय बांधलं गेलं. त्यावेळी नवरोतमदास माधवदास यांनी रुग्णालय बांधकामासाठी सुमारे ३५ टक्के रक्कम दिली होती. आता कालांतराने एका नव्या जडणघडणीत रुग्णालय आकार घेणार आहे.
हेही वाचा :