सातारा - पवार कुटुंबानं मोहरे तयार करून अनेकांना त्रास दिला. राजकीय पिढ्या उद्धवस्त केल्या आहेत. माझ्या प्रकरणातील मोहरे हे त्यांचंच पीक आहे. आता अडचणीत आल्यावर त्या मोहऱ्यांनाही ते सोडतील. आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू, असं ते म्हणत असतील तर ३ कोटीच्या खंडणीत तुमचाही (आमदार रोहित पवार) वाटा होता का, असा थेट सवाल मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पवार कुटुंबाकडून राजकीय पिढ्या उद्ध्वस्त - सत्तेच्या जोरावर खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेल्या पीडित महिलेच्या पाठीशी राहणार असल्याचं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी साताऱ्यात केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री गोरे म्हणाले, आजपर्यंत पवार कुटुंबानं पोलिसांचा वापर करून अनके कुटुंब, राजकारणातील नव्या पिढ्या उद्धवस्त केल्या आहेत. त्यामुळं सत्तेत असताना आपण जसं वागत होतो, तसंच आम्ही वागतोय, असं त्यांना वाटत असावं.
कुणी प्लॅन केला, ते आजोबांना विचारा- आमदार रोहित पवार हे जरी मोठ्या राजकीय कुटुंबातील असले तरी त्यांची राजकीय उंची छोटी आहे. त्यांना कधी संघर्ष करावा लागला नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माणसाला सामान्यांचं दुःख कसं समजणार? त्यांचा व्यवस्थेवर विश्वास नसेल तर कुणी प्लॅन केला? कुणी खंडणी मागितली? हे त्यांनी आजोबांना विचारावं, असा सल्लाही मंत्री गोरेंनी दिला.
रोहित पवारांच्या सर्टिफिकेटची गरज नाही- मंत्री गोरे पुढं म्हणाले की, मी नेहमी सत्तेच्या विरोधात लढत आलो. सत्तेशी संघर्ष केला. सामान्य माणसाची लढाई लढली. त्यामुळं मंत्री म्हणून मी केलेल्या कामाला रोहित पवारांसारख्या छोट्या माणसाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. राज्यातील जनता माझ्या कामाचं सर्टिफिकेट देईल. स्वतः काय केलंय, काय करतोय, हे त्यांनी पाहावं, असा टोलाही मंत्री गोरेंनी रोहित पवार यांना लगावला.
पवार कुटुंबांशी कधी जमलं नाही- मी आता भाजपामध्ये आहे. यापूर्वी वेगळ्या विचाराच्या पक्षात होतो. परंतु, मी कोठेही असलो तरी पवार कुटुंबाशी माझं कधीही जमलं नाही. तसचं जमवूनही घेतलं नाही. मी सामान्यांसाठी राजकारण करतो. दुष्काळी भागाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका मांडून लढतो. याचं त्यांना वाईट वाटत असेल. हे करत असताना मी कधीही पवार कुटुंबाची मदत मागितली नाही, ही माझी चूक असावी. त्यामुळं कदाचित मी त्यांना खुपत असेल, असा टोलादेखील मंत्री यांनी पवार कुटुंबाला टोला लगावला.
हेही वाचा-