अमरावती - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ दलितांपर्यंत मर्यादित नाहीत तर ते प्रत्येक समाजातील तळागाळाती व्यक्तीच्या उद्धारासाठी कामी येणारे आहेत. हाच विचार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जयभीम पँथर हा चित्रपट 11 एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्वच शहरातील चित्रपटगृहात झळकलाय. या चित्रपटाचं वैशिष्ट म्हणजे हा धम्मदानातून जमा झालेल्या पैशातून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. अमरावती शहरातील अभिनेता विनय धाकडे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारतोय.
समाज परिवर्तनवर भाष्य- भदंत शिलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम्स फिल्म प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. चित्रपटात गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजित चव्हाण आणि माझी प्रमुख भूमिका आहे. पाच मित्रांच्या संघर्षाची ही कहाणी आहे. ही कहाणी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला स्पर्श करते, असं विनय धाकडे यानं चित्रपटाची पार्श्वभूमी सांगितली. जीवनाच्या संघर्षावर चित्रपट भाष्य करतो, असं अभिनेता विनय धाकडे यानं सांगितलं.
संकटानंतर सावरण्याचा संदेश- प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं येतात. अशा संकट काळाचा मुकाबला करणं. संकट काळातून सुरक्षित बाहेर पडणं. त्यानंतर स्वतःला सावरणं यावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, रमाबाई या थोर व्यक्तींचे विचार समाजाला कसे हितकारी आहेत, असा संदेश देण्याचा प्रयत्नदेखील चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलाय.
ऑगस्ट महिन्यात सुरू झाली शूटिंग- या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत धापसे यांनी केलंय. या चित्रपटाची शूटिंग ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती. चित्रपटासाठी निर्मात्यांनी धम्मदान मागितलं होतं. जे काही दान मिळालं, त्यातून हा चित्रपट साकारण्यात आला. प्रत्येकानं हा चित्रपट पाहावा. त्यातून बोध घ्यावा असं विनय धाकडे यानं आवाहन केलं. कार्यकर्ता हा कोणतीही पक्षाचा, विचाराचा असला तरी त्यांच्या वाट्याला येणारं काम आणि अनुभव हे सारखेच असतात. या चित्रपटात कार्यकर्त्यांच्या वास्तविक आयुष्याचं चित्रण आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा असं आवाहनदेखील विनय धकाडे यांनी केलंय.
- अमरावती शहरातील इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारो अमरावतीकरांनी गर्दी केली. यावेळी जयभीम पँथर या चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त चिमुकल्यांच्या लेझीम पथकानं कवायती सादर केल्या. यावेळी अभिनेता विनय धाकडे यानं उपस्थितांशी संवाद साधला.
हेही वाचा-