जळगाव : जळगाव जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे बोगीला आग लागल्याच्या अफवेने जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयाच्या डीनने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव सिव्हिल रुग्णालयात ११ प्रवाशांचे मृतदेह आणण्यात आले. तसंच ४० जखमींना आणलं आहे. मृतांचा आकडा नंत वाढून १२ झाला आहे. तर जखमींपैकी ४ जण गंभीर असल्याची माहिती रुग्णालयानं दिली आहे.
पुष्पक एक्सप्रेसमध्ये पसरली आगीची अफवा : मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळं धूर आल्यानं आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडलं. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्यानं एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळं प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली.
बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं : या अफवेमुळं बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. त्यामुळं 35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्यानं बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमी नागरिकांना जळगाव रेल्वे स्थानकावर आणले : पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्यानंतर जखमी असलेल्या नागरिकांना कर्नाटक एक्सप्रेसमधून जळगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात येत आहे. जखमी प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकाबाहेर डॉक्टरही तैनात करण्यात आले आहे. तसंच रुग्णवाहिकातूनही रुग्णांना आणण्यात येत आहे. बहुतांश मृत प्रवासी हे जनरल डब्यातील प्रवासी होते. आता सर्वात मोठं आव्हान हे मृतदेहांची ओळख पटवंण्याचं आहे. सर्वच मृतदेह अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत आहेत. मृतदेहांचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे ओळख पटवणे अतिशय कठीण झाले आहे. त्यासाठी गरज पडल्यास डीएनए चाचणी करण्यात येईल असं प्रशासनानं सांगितलं आहे. तर अपघातग्रस्त सर्वजण परप्रांतीय होते, असा अंदाज रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा -
- आगीच्या अफवेनंतर पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या, बंगळुरू एक्स्प्रेसनं किमान आठ जणांना चिरडलं
- ओडिशातील रेल्वे अपघात प्रकरण; 300 प्रवाशांचा तिहेरी अपघातात बळी, आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
- हावडा सीएसएमटी एक्सप्रेस अपघातग्रस्तांना 50 हजारांची मदत, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल - Howrah Mumbai Train Accident