ETV Bharat / state

इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जळगावच्या सुवर्ण बाजारावर; लग्नसराईतच सोने झाले स्वस्त

इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाचा परिणाम जळगावमधील सुवर्ण बाजारात दिसत आहे. मागील सात दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे.

JALGAON GOLD RATE
सोन्याच्या दरात घसरण (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 28, 2025 at 4:27 PM IST

|

Updated : June 28, 2025 at 5:54 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

जळगाव : इराण-इस्रायल दरम्यानच्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम आता जळगावच्या सुवर्ण बाजारावरही दिसून येत आहे. गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 3,200 रुपयांची घसरण झाल्यानं लग्नसराईत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जळगावच्या सराफा बाजारात सात दिवसांपूर्वी सोन्याचा भाव जीएसटीसह 1,02,000 रुपये प्रति तोळा इतका विक्रमी पातळीवर पोहोचला होता. मात्र शनिवारी तोच दर घसरून 98, 800 रुपये प्रति तोळा झाला आहे.

सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता : शनिवारचा 24 कॅरेट सोन्याचा दर 95,800 रुपये इतका असून, त्यावर जीएसटीसह अंतिम दर 98,800 रुपये इतका आहे. भावात झालेल्या घसरणीमुळं बाजारात सोन्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही भावातील घसरण सकारात्मक वाटत असून, पुढील काही दिवसांत आणखी घसरण होण्याची शक्यता जाणकार व्यापारी वर्तुळातून वर्तवली जात आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य स्थिर राहिल्यास सोन्याच्या दरात आणखी घट होऊ शकते, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लग्नसराईत सुवर्णदालनात चैतन्य : घराघरात लग्नसराईची लगबग सुरू असतानाच सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून सतत वाढत असलेला सोन्याचा दर शनिवारी तब्बल तीन हजार रुपयांनी घसरल्यानं अनेक कुटुंबीयांनी आपल्या घरातील लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दागिन्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी : अनेक ग्राहक मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण होण्याची वाट पाहत होते. आज अखेर ही प्रतीक्षा संपली. शनिवारी सोन्याचा दर सुमारे 3,200 रुपयांनी कमी झाल्यानं बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. काही ठिकाणी चांदीच्या दरातही लक्षणीय घट झाली आहे. ज्यामुळं विवाह कार्यासाठी आवश्यक चांदीच्या वस्तू खरेदीसाठीदेखील ग्राहक मोठ्या प्रमाणात सरसावले आहेत.

प्रतिक्रिया देताना व्यापारी आणि ग्राहक (ETV Bharat Reporter)

सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची आशा : "आमच्या घरात लग्नसराई आहे. मागील काही दिवस आम्ही सोने खरेदी थांबवली होती. भाव कमी होण्याची आम्ही हमी धरली होती. शनिवारी तब्बल तीन हजार रुपयांनी भाव कमी झाल्यानं आम्ही लगेच खरेदीसाठी आलो आहोत. अजून थोडी घसरण होईल, अशी आशा आहे," असं जळगावमधील एका ग्राहकानं सांगितलं. सोनार संघटनांच्या म्हणण्यानुसार, "जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर आणि आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव यामुळं सोने-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र सध्या कमी झालेला दर पाहता लग्नसराईत ग्राहकांचा ओघ काही दिवसांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. आमदार संग्राम जगतापांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढवणार?
  2. सरकार लक्ष देईना! आदिवासी बांधवांच्या मरणयातना सुरूच; भर पावसात 20 किलोमीटर पायपीट करून रुग्णाला रुग्णालयात पोहोचवलं
  3. "शिक्षणाधिकारी साहेब पडक्या शाळेत आम्ही शिक्षण घ्यायचं कसं?" विद्यार्थ्यांचा सवाल, शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!
Last Updated : June 28, 2025 at 5:54 PM IST