मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा दावा करतानाच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात बेटिंगवरुन पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला. आता आयपीएल सुरू झालं असून त्यावर मोठ्या प्रमाणावर बेटिंग अॅपद्वारे सट्टा लावण्यात येतोय. यात मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांचीही मदत होत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. दरम्यान, संबंधित माहिती असलेला एक पेन ड्राईव्ह अंबादास दानवे यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे दिलाय.
पेन ड्राईव्हमध्ये सर्व माहिती : अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेला सुरूवात करताना अंबादास दानवे यांनी बेटिंगवरून खळबळजनक आरोप केलेत. लोटस २४ नावाच्या अॅपचा वापर बेटिंगसाठी होत असल्याचं सांगत मेहुल जैन, कमलेश जैन, हिरेन जैन या सट्टेबाजांची नावं अंबादास दानवे यांनी घेतली. तसंच हे पाकिस्तानी खेळाडुंसोबत सट्टेबाजी करतात, असंही अंबादास दानवे यांनी सांगितलं. "खालच्या सभागृहात बेटिंग अॅपवर चर्चा झाली होती. माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे. हे लोक सातत्यानं ज्या पद्धतीनं बेटिंग करतात. पाकिस्तानातील खेळाडुंशी यांचे संपर्क आहेत. दुबईतून आले आणि खुले आम मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक करतात. पोलीस अधिकाऱ्यांची नावे मी घेणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी संपली. आता आयपीएलसाठी मुंबईत ही मंडळी काम करतेय. पेन ड्राईव्हमध्ये पाकिस्तानातील लोकांशी काय काय बोलणं झालं, तो तपशील आहे. कोणत्या अधिकाऱ्यांची नावं आहेत, ते तपासावं. खुले आम राज्यात अशा घटना घडत आहेत", असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
राज्यात पालघरमधून मोठ्या प्रमाणात गुटखा : याचबरोबर, राज्यात आष्टी, जळगाव जामोद, गडचिरोली इत्यादी ठिकाणी लाखोंचा गुटखा जमा होतो. टपरीवाल्यांवर गुटख्यासाठी कारवाई होते. मात्र, परिवहन विभाग व पोलिसांच्या संरक्षणात गुजरातमधून थेट गुटखा राज्यात येतो. पालघर येथून मोठ्या प्रमाणावर गुटखा राज्यात येतो. तो गुटखा तिथेच जप्त करा ना, लहान टपरीवाल्यांवर काय कारवाई करता. लहान लोकांशिवाय त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलीय.
राज्यात मटका जोरात : अंबादास दानवे यांनी राज्यात सर्रास सुरू असलेल्या मटकावर टीका केलीय. या राज्यात मटका जोरात आहे. मौदा येथे, संभाजीनगरमध्ये वैजापूर तालुक्यात शिरुर गावात मोठ्या प्रमाणात मटका चालतो. राज्यात घडणाऱ्या अशा घटनांसाठी जबाबदार कोण आहे, असा सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय. तसंच, पोलिसांचा अशा गुन्ह्यांमध्ये सहभाग चिंताजनक असल्याचंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
फसवणूक नारायणगावात, गुन्हा ठाण्यात का? : अंबादास दानवे यांनी एका डिजिटल गुंतवणुकीच्या फसवणुकीच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "ठाण्यातील एक प्रकरण आहे. घटना पुण्यातील नारायण गावात घडली. अहमदाबादचे सुधीर कोठडिया यांनी डिजिटल गुंतवणुकीच्या माध्यमातून या भागातील २ हजार कोटी रुपये जमा केले. ही रक्कम हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठविली. भारतातही त्यांनी अनेक ठिकाणी गुंतवणूक केली. त्यातील पराग शाह नावाच्या व्यक्तीनं पैसे गोळा केले. गुन्हा नारायणगाव येथे नव्हे, तर ठाण्यात दाखल झाला. २०२१ पासून घटना घडतायेत. गुन्हा फक्त २० कोटी रुपयांचाच अपहार झाल्याचा दाखल झाला आहे. याचा तपास करायला हवा", अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलीय.
हेही वाचा :