अमरावती : शहरातील निसर्गरम्य वडाळी तलाव येथे २०१० मध्ये योगासन वर्गाला सुरुवात झाली. या वर्गाला असणाऱ्या महिलांनी पंधरा वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस अशी कशाचीही तमा न बाळगता योगासनाचे धडे घेण्याचं सुरूचं ठेवलं. सुरुवातील तीन ते चार जणींचा असणारा ग्रुप आज चाळीस महिलांचा झाला आहे. या महिलांपासून प्रेरणा घेत परिसरातील अनेकांनी योगसाधना सुरू केली. परिसरातील पुरुष मंडळी, वृद्ध मंडळी यांना योग केल्यानं अनेक व्याधींवर आराम जाणवायला लागला. आज जागतिक योग दिनाच्या पर्वावर वडाळी तलाव येथे परिसरातील सारेच एकत्र येण्याचा योग साधत सर्व मिळून योगासने केली.
पायी फिरण्यासोबतच योगसाधना : गत दहा पंधरा वर्षापासून तलाव परिसरासह लगतच्या राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसरात वर्धा, चांदूर रेल्वे मार्गानं अनेक पुरुष मंडळी पहाटे साडेचार वाजल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यंत फिरायला जातात. यापैकी अनेकांना काही आजार जडले आहेत. इतकं फिरुनही आराम नाही अशा चर्चेतून आपणही योगासने करून पाहायला हवीत, असा विचार सात आठ महिन्यांपूर्वी समोर आला. वडाळी परिसरातील नरेश दरेकर या युवकानं पुढाकार घेत अनेक तरुण, सेवानिवृत्त तसंच वृद्ध पुरुषांना तलावावर योगासनाचे धडे देण्यास सुरुवात केली. आज सहा महिन्यांपासून अनेकांना योगसाधनेचा फायदा जाणवू लागला आहे. रोज सकाळी सहा ते आठ वाजेदरम्यान थोडसं पायी फिरण्यासोबत पंचवीस ते तीसजण नियमित योगासने करतात.
महिलांमध्ये प्रचंड उत्साह : पंधरा वर्षापासून परिसरात योगासने करणाऱ्या काही महिलांसोबत आज जवळपास चाळीस महिला जुळल्या आहेत. कधी वडाळी तलावावर तर कधी परिसरात असणाऱ्या श्री इंद्रशेष महाराज संस्थांच्या सभागृहात या महिला सलग १५ वर्षांपासून योगासने करत आहेत. मिना धापड या योग शिक्षिकेच्या मार्गदर्शनामुळं अनेक महिला त्यांना असलेल्या आरोग्याच्या जुन्या समस्येतून मुक्त झाल्या आहेत. योगासनामुळं आम्हाला दिवसभर कामाची स्फूर्ती मिळते. आम्ही न चुकता प्रत्येक दिवशी योगासने करतो, असं रत्ना भाटकर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणल्या.

योगदिनानिमित्त विशेष कार्यक्रम : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकरा वर्षांपूर्वी सत्तेत आलेत आणि त्यांनी २१ जून हा दिवस 'राष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करण्याचं आवाहन जगासह देशाला केलं. त्यामुळं ११ वर्षांपासून योग दिन सोहळ्याचा योग सतत जुळून येतो आहे असं रहिवासी जगदीश कांबे, प्रफुल बोके म्हणाले. विशेष म्हणजे वडाळी परिसरात सकाळी ६.३० मिनिटांनी आयोजित या सामूहिक योगासनाच्या विशेष कार्यक्रमाला भाजपाचे शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. रवींद्र खांडेकर आणि ॲड. प्रशांत देशपांडे यांनी भेट दिली.

हेही वाचा -