छत्रपती संभाजीनगर : राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असून काही धार्मिक संघटनांनी कबर काढण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं पोलीस विभाग सतर्क झालाय. खुलताबाद येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. तसंच, परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. याचबरोबर, कबर असलेल्या दर्ग्यात जाण्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मार्गावर नाकाबंदी करण्यात आलीय. तसंच, दर्ग्याच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येकाची ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जातोय.
सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू : राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलंय. काही धार्मिक संघटनांनी कबर काढण्याचा इशारा दिलाय, तर काही संघटनेच्या लोकांनी खुलताबाद परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई देखील केलीय. चार जणांना जिल्हा बंदीची नोटीस देखील बजावण्यात आलीय. दरम्यान, समाज कंटाकांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गावात सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. जवळपास ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ज्यामधे मंदिर, मोकळी मैदानं, मुख्य रस्त्यांचा समावेश असणार आहे. लवकरच काम पूर्ण होईल, त्यामुळं प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं अधिक सोपं होईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी व्यक्त केलाय.
आधीचे कॅमेरे झाले खराब : याचबरोबर, खुलताबाद येथे सुरक्षा वाढवण्यात आलीय. नव्यानं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू झालं असलं तरी याआधी कॅमेरे बसवण्यात आले होते. एप्रिल २०१८ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तीन ठिकाणी ६२ कॅमेरे बसवण्यासाठी १९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसंच, कॅमेरे बसवण्यात देखील आले होते. मात्र देखभाल दुरुस्ती नसल्यानं ते बंद पडले तर काही ठिकाणचे कॅमेरे देखील गायब झाले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिलीय.
कबर पाहण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य : दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आल्यानं अनेक जण खुलताबाद येथील दर्ग्यावर उत्सुकता म्हणून जात आहेत. मात्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यानं काही पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. कबर ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलंय. तसंच, दर्ग्यात मोबाईल, किंवा कोणतीही बॅग घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलीय.
हेही वाचा -