हैदराबाद : मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेसच्या एका डब्यात भारतातील पहिल्यांदा ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) बसवण्यात आलं आहे. हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक अनोखा उपक्रम आहे. बँक ऑफ महाराष्ट्राद्वारे प्रदान केलेलं हे एटीएम एसी चेअर कार डब्याच्या मागील बाजूस, सामान्यतः छोट्या पँट्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागेत स्थापित करण्यात आलं आहे. लवकरच हे एटीएम प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
In a first, ATM facility in train. pic.twitter.com/onTHy8lxkd
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 16, 2025
मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस
मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 12109) ही दररोज चालणारी एक्सप्रेस गाडी आहे, जी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मनमाड जंक्शन (MMR) दरम्यान प्रवास करते. हा प्रवास सुमारे 4 तास 35 मिनिटांचा आहे. या गाडीच्या एसी चेअर कार डब्यातील मागील बाजूस असलेल्या छोट्या पँट्रीच्या जागेत बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम बसवण्यात आलं आहे. सुरक्षितता आणि प्रवासादरम्यान सुलभ वापर सुनिश्चित करण्यासाठी या मशीनला शटर दरवाजानं संरक्षित केलं आहे. मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये या डब्यात आवश्यक बदल आणि सुसज्जता करण्यात आली आहे. एटीएम चालू ठेवण्यासाठी पुरेशी विद्युत व्यवस्था आणि संरचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळं गाडी चालू असताना मशीन अखंडपणे कार्य करेल. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातील इनोव्हेटिव्ह अँड नॉन-फेअर आयडियाज योजनेचा हा एक भाग आहे.
“आज सकाळी हे एटीएम असलेले डबे घेऊन गाडी मुंबईत पोहोचली. हा एक अनोखा उपक्रम आहे आणि आम्हाला आशा आहे, की यामुळं प्रवाशांना मोठी सोय होईल.” - डॉ. स्वप्नील नीला, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी
"भुसावळ विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांना बँक ऑफ महाराष्ट्रात खाते असणे बंधनकारक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि रेल्वे प्रशासन यांच्या या संयुक्त उपक्रमामुळे भुसावळ ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच फायदा होईल". - प्रमोद मुळे, माजी वरिष्ठ अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र
प्रवाशांना होणार मोठी सोय
पंचवटी एक्सप्रेस, जी गिनीज बुकात नोंदवली गेली आहे, तिच्यामधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. यात नाशिकचे व्यापारी, नोकरदार, रुग्ण, विद्यार्थी यांचा समावेश आहे. आता या गाडीत बसवलेले एटीएम प्रवाशांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अचानक गरज पडणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होईल. हे एटीएम मोबाइल नेटवर्कद्वारे सतत जोडलेले राहील, त्यामुळे गाडी चालू असतानाही पैसे काढता येतील.
हे वाचलंत का :