छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीवरून निघालेला वाद चांगलाच पेटत चालला आहे. त्यात आता औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबाद गावाचं नाव बदलण्याची मागणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी "शहराचं काय देशाचे नाव बदलून मोदीस्थान ठेवा," अशी मागणी केलीय. तसंच, "मागणी करणारे किमान शिक्षित असायला हवे, काही दिवसांनी स्वतःच्या वडिलांचे नाव देखील बदलायला कमी करणार नाहीत. नाव बदलायचे तर आदी अहमदाबादचे बदलून दाखवा," असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलंय.
गावाचं नाव करा रत्नपूर : दरम्यान. सुफी संतांची भूमी म्हणून खुलताबाद प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी औरंगजेबची कबर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कबर काढण्यासाठी राजकारण तापलं आहे. अशा वेळी कबर असलेल्या खुलताबाद गावाचं नाव रत्नपूर करा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा राज्याचे समाज कल्याणमंत्री संजय शिरसाट यांनी केली होती. तसंच, "औरंगजेबाची कबर काढावी," अशी मागणी त्यांनी अनेक वेळा केली होती. त्यात आता रत्नपूर असं नामांतर करा, अशी देखील मागणी त्यांनी केलीय. त्यामुळं नावावरून वाद आणखी वाढलाय.
देशाचं नाव बदला : "गावाचं नाव बदलण्याचा विषय, ज्यांना काही काम नाही, असे लोक काढतात. लोकप्रतिनिधी शिक्षित असले पाहिजे त्यांना आपल्या गरजा काय आहेत ते कळतं. आपल्या भागात काय सुविधा आणू, शिक्षणिक संस्था आणू हे त्याला कळतं. मात्र, तसं होत नसल्यानं हिंदू, मुस्लीम, दलित असे मुद्दे, जुने मुद्दे ते काढतात. त्यांना माझ्या समोर बसवा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत माहिती विचारा. त्यांना ती सांगता येणार नाही. फक्त शहरात पुतळा आहे, जिथं आपण जाऊन अभिवादन करतो, एवढेच ते सांगतील," असं सांगत इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केलीय. तसंच, "पंतप्रधान मोदी यांनी लोकांना काही काम दिलेलं नाही, ऐंशी कोटी लोकांना धान्य देण्याची मदत केल्याचं सांगतात. जिल्ह्याचं काय देशाचं नाव बदला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देऊन मोदीस्थान करा, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर कोणता देव आला होता ते कळेल," अशीही टीका इम्तियाज जलील यांनी केलीय.
अहमदाबाद कसे चालते? : "कामाच्या मुद्दे सोडून इतर गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. नाव बदलण्याचं काम करणाऱ्यांना महाराष्ट्रातील अहमद चालत नाही, मग गुजरात मधील अहमद कसे चालतात. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदललं तर, मग गुजरातमधील अहमदाबाद हे नाव का बदललं नाही, ते देखील बदलून दाखवा", असा संतप्त सवाल सुद्धा इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत केलाय.
हे तर बाळासाहेबांनी दिलेलं नाव : दुसरीकडं, "खुलताबाद नाव बदलून रत्नपूर करा अशी मागणी केली जात आहे. ही मागणी सर्वात आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. १९८८ मध्ये जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करा अशी मागणी केली होती, त्याच दिवशी ही मागणी देखील त्यांनी केली होती. तेव्हापासून आम्ही खुलताबाद नाही तर रत्नपूर असाच उल्लेख करतो," असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :