मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं आहे. मागील साडे-तीन आठवड्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. आजच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचं एकमतानं निवड करण्यात आली. अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांचे कौतुक करताना काही मजेशीर किस्से सभागृहात सांगितले.
रात्री दोन वाजता एबी फॉर्म दिला : "अण्णा बनसोडे हे पिंपरी चिंचवड येथील प्रतिनिधित्व करतात. अतिशय मेहनत करून ते राजकारणात पुढे आलेले आहेत. पानटपरी ते आज त्यांचा विधानसभा उपाध्यक्ष हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे", असं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच, "२०१९ रोजी पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारली होती. परंतु मी रात्री दोन वाजता त्यांना एबी फॉर्म दिला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं की, अण्णा बनसोडेचं तिकीट का कापलं आहे? तेव्हा जयंत पाटील म्हणाले की, माझ्या हातात काही नाही. वरून निर्णय झालाय. त्यानंतर मी रात्री दोन वाजता भेटून अण्णा बनसोडेंना एबी फॉर्म दिला आणि त्यानंतर जयंत पाटलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी जयंत पाटील मला म्हणाले की, तुम्ही एबी फॉर्म दिला आहे, पण माझं नाव सांगू नका", असं अजित पवार यांनी सांगितलं. तेव्हा सभागृहात एकच हसा पिकला.
विश्वजीत, अमित हे तुम्ही बघा... : पुढं अजित पवार म्हणाले की, "२०१९ मध्ये अण्णा बनसोडे निवडून आले आणि मी घेतला निर्णय योग्य होता, हे दिसलं. त्यांनी माझं ऐकलं म्हणून त्यांचं आज भलं झालं. तसं राजकारणात माझं ऐकलं की, किती भलं होतं... विश्वजीत, अमित हे तुम्ही बघा..." असं विश्वजीत कदम आणि अमित देशमुख यांच्या दिशेनं बघत अजित पवार यांनी सांगितलं. त्यावेळीही सभागृहात एकच हशा पिकला.
हेही वाचा :
- अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...
- "महाराष्ट्राचा जीडीपी देशात सर्वात जास्त, विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव उथळ", विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचं उत्तर!
- "वारंवार खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार का?", सुषमा अंधारेंची सरकारवर टीका