मुंबई : ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे आता राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबईत कामगार सेनेच्या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळं दोन भाऊ आता हात मिळवनी करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
... मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा : मुंबईत कामगार सेनेच्या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, "किरकोळ भांडण बाजूला ठेवून सोबत यायला मी देखील तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन मी देखील करतो आहे. मात्र, यात माझी एक अट आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही जेव्हा सांगत होतो, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला घेऊन जात आहेत. त्यावेळी विरोध केला असता तर आज इथे मराठी माणसाच्या हिताचे सरकार बसले असते. महाराष्ट्रात देखील हे सरकार बसलं नसतं. तेव्हा पाठिंबा द्यायचा आणि आता विरोध करायचा, हे चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात जो कोणी बोलेल, त्याचे आदरातिथ्य मी करणार नाही. त्याला घरी बोलवणार नाही. त्यासोबत पंगतीला बसणार नाही. हे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा", असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्टपणं सांगितलं.
काय म्हणाले राज ठाकरे? दरम्यान, अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना 'उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार का?' असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नाला कोणतीही बगल न देता किंवा या प्रश्नावर बोलणं न टाळता राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. महाराष्ट्रातील प्रश्नांसमोर महाराष्ट्रातील समस्यांसमोर आमच्यातील वाद मतभेद किरकोळ असल्याची प्रतिक्रिया या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी दिल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. महेश मांजरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांसमोर त्यांच्या समस्यांसमोर आमच्या दोन भावातील वाद मतभेद फारच किरकोळ आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर या सर्व गोष्टी शुल्लक आहेत. आम्ही एकत्र येणं एकत्र राहणं या गोष्टी फार कठीण आहेत, असं मला वाटत नाही. विषय फक्त इच्छाशक्तीचा आहे. कारण हे केवळ माझ्या एकट्या पूर्त मर्यादित नाही, माझं तर मत आहे. सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा", अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
"आमच्यातले वाद, भांडण छोटी", राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना युतीसाठी पुन्हा टाळी ?
'औरंगजेबानं नागरिकांवर अत्याचार केले, मात्र काही लोक त्याला नायक मानतात': राजनाथ सिंहांचा हल्लाबोल