मुंबई- सीमाशुल्क विभागानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केलाय. हायड्रोपोनिक गांजा घेऊन प्रवासी बँकॉकवरून मुंबईत तस्करीच्या उद्देशाने आला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. दोन वेगवेगळ्या कारवाईत सीमाशुल्क विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तीन प्रवाशांना अटक केली असून, त्यांच्याकडून 9.53 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा आणि 53.83 लाख रुपयांचे सोने जप्त केलंय, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये 20 पाकिटे सापडली : मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 6 एप्रिल रोजी बँकॉकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला अटक केली आणि त्याच्याकडून 9.532 किलोग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा जप्त केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर कवलजीत सिंह (वय वर्ष 31) याला ताब्यात घेण्यात आलंय. तो रविवारी विमानाने बँकॉकहून मुंबईत पोहोचला होता. सिंहच्या हालचालींवरून त्याच्यावर संशय आल्यानंतर सिंहला थांबवून त्याची झाडाझडती घेण्यात आली. परंतु त्यावेळी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्याकडे काहीही सापडले नाही, मात्र त्याच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये 20 पाकिटे सापडली. ती पाकिटे इतर वस्तूंसोबत लपवून ठेवण्यात आली होती. झडतीदरम्यान त्यात हिरवी पाने सापडली, त्यांची तपासणी केली असता बॅगेत गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
मुंबईला जाणाऱ्या दोन प्रवाशांकडे 21 कॅरेट सोने : प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये हा गांजा लपवण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या एका प्रकरणात दुबईहून मुंबईला जाणाऱ्या दोन प्रवाशांना 21 कॅरेट कच्च्या सोन्याच्या तुकड्यांच्या स्वरूपात 789 ग्रॅम वजनाच्या तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय, असे त्यांनी सांगितले. सोने त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिलीय.
हेही वाचाः
“Excuse Me” बोलण्यावरून मराठी-उत्तर भारतीयांत वाद; भर रस्त्यात केली बेदम मारहाण
जात किंवा धर्मामुळे लोकांना घर नाकारणे हे 'निराशाजनक' : राज्यपाल राधाकृष्णन