ठाणे : बायकोला घरातच ठार करून नवरा त्याच्या आठ वर्षीय मुलाला घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील ताडाळी परिसरात असलेल्या एका भाड्याच्या घरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोर नवऱ्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंजु श्रवणकुमार सहनी (33) असं हत्या झालेल्या मृत बायकोच नाव आहे. तर श्रवणकुमार सुरेश सहनी (40) असं बायकोचा खून करणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे.
बिहारचं आहे दाम्पत्य : "आरोपी नवरा श्रवणकुमार आणि त्याची मृत बायको मंजु मूळचे बिहार राज्यातील आहेत. पंधरा दिवसापूर्वीच त्यांच्या आठ वर्षीय मुलासह ताडाळी येथील कोहिनूर किराणा स्टोअर्सच्या बाजूला असलेल्या एका भाड्याच्या खोलीत ते राहायला आले. त्यातच काही कारणावरून बुधवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास नवरा बायकोमध्ये वाद होऊन सदर वाद विकोपाला गेला. त्यामुळे श्रवणकुमारनं मंजूची घरातच हत्या करून तो आठ वर्षाच्या मुलासह घटनास्थळावरून फरार झाला आहे," अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद कुंभार यांनी दिली.
पोलिसांनी स्थापन केली 4 पथक : दरम्यान घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे. या हत्येप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात साहेबराव धागो चौधरी (59) यांच्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात भान्यासं कलम 103 प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा शोध घेण्यासाठी भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिसांचे चार पथक आरोपीच्या शोधात रवाना झाले आहेत, अशी माहितीही पोलीस निरीक्षक प्रमोद कुंभार यांनी दिली. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करणार असून त्याच्या अटकेनंतरच हत्येचं कारण समोर येणार आहे, असंही पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सांगितलं.
हेही वाचा :