वाशिम : जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी खरब येथे धक्कादायक घटना समोर आली. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा खून केला आहे. नंतर पतीनं स्वत: आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघड झाली.
रागाच्या भरात पत्नी झोपेत असताना तिच्या डोक्यात पतीने लोखंडी रॉडने वार केले. तसंच विळ्यानेही वार केले. नंतर स्वत: आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत पतीचे नाव गौतम वर (वय वर्ष ५२) तर, पत्नीचे नाव ज्योती गौतम वर (वय वर्ष ४५) असे आहे.
नेमकं काय घडलं? - प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू होते. अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघांमध्ये कायम भांडणं होत होतं. पती पत्नीमध्ये वाद होत असतानाच या वादाला हिंसक वळण लागलं.
पत्नी झोपेत असतानाच तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने गौतमने वार केले. तसेच विळ्याने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:च्या रक्ताने माखलेल्या अवस्थेत घराशेजारील टिनशेडमध्ये आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कौटुंबिक वादाचे भीषण परिणाम पुन्हा एकदा समाजासमोर आले आहेत.
हेही वाचा...