ETV Bharat / state

शेतमालाचे पैसे थकले तर शेती कशी टिकणार?, 3 कोटींचा घोटाळा करणाऱ्याला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

गुन्ह्यात होणारी अटक टाळण्यासाठी प्रवीण जाधवनं उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती.

High Court
मुंबई उच्च न्यायालय (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2025 at 3:16 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे वेळेवर मिळायलाच हवेत. शेतकऱ्यांचे पैसे थकले तर शेती आणि शेतकरी कसा टिकेल? असं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं 300 शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्याचा व्यापाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

काय आहे प्रकरण? : नाशिक येथील रहिवासी प्रवीण जाधव विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात काही शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे न दिल्याचा प्रवीण जाधववर आरोप आहे. या गुन्ह्यात होणारी अटक टाळण्यासाठी प्रवीण जाधवनं उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या गुन्ह्यांत 300 शेतकऱ्यांचे 2 कोटी 89 हजारांची फसवणूक झालेली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी प्रवीण जाधवसह अन्य एकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

जाधवचा न्यायालयातील बचावात्मक दावा ठरला फोल : याप्रकरणी शेतमाल विक्रीच्या पावत्या प्रवीण जाधवच्या नावानं बनवण्यात आलेल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांचा शेतमाल विकलाच गेला नसल्याचा दावा प्रवीण जाधवनं केला आहे. तसंच त्यानं हा शेतमाल नंतर वैभव ढेपळे या सहआरोपीला विकला होता. आपला केवळ ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून शेतमाल शेतातून नाशिक एपीएमसीमधून पोहोचवणं एवढीच त्याची जबाबदारी असते. त्यामुळं पावत्यांवर माझं नाव आहे, पुढं मालाचं काय झालं? याची माहिती नसल्याचा दावा जाधवनं आपल्या बचावात न्यायालयात पुढं केला होता.

उच्च न्यायालयाचा निकाल काय? : शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतमालाच्या विक्रीवर निर्भर असतो. त्यामुळं त्यांच्या शेतमालाचे पेसे शेतकऱ्यांना वेळेवर मिळायलाच हवेत. त्यांचे पैसे थकल्यास पुढील हंगामात शेती करणं कठीण होऊन जातं. शेतकरीच टिकला नाही, तर शेती कशी टिकेल? असा सवाल न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी उपस्थित केला. याप्रकरणी शेतकऱ्यांनी प्रवीण जाधववर विश्वास दाखवून आपला शेतमाल त्याला सोपवला होता. त्यामुळं याप्रकरणी प्रवीण जाधवची चौकशी होणं गरजेचं आहे, असं स्पष्ट करत न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी प्रवीण जाधवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.