‘....तरीही योगेश कदम जजमेंट देतात तो कसा सज्जन आहे;’ गुंड निलेश घायवळ प्रकरणात अनिल परबांचे गंभीर आरोप
रामदास कदम यांचे चिरंजीव आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय.

Published : October 9, 2025 at 5:21 PM IST
मुंबई – दसरा मेळाव्यापासून सुरू झालेला रामदास कदम, योगेश कदम विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि अनिल परब यांच्यातील संघर्ष अद्याप शांत झालेला नाही. बाळासाहेबांचे ठसे हे प्रकरण शांत होत नाही तोच आता अनिल परबांनी रामदास कदम यांचे चिरंजीव आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय. सोबतच योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील अनिल परब यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे माहीत नाही : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर सध्या गुंड निलेश घायवळ चर्चेत असून, या प्रकारात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. गुंड घायवळला परदेशात जाण्यास कोणी मदत केली? त्याला शस्त्र परवाना द्यावा म्हणून कोणी शिफारस केली, असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. या प्रकरणात योगेश कदम यांनी थेट मदत केल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. या प्रकरणी बोलताना अनिल परब म्हणाले की, "महाराष्ट्र राज्याला नेहमी कलंकित करणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक पुरावे मी आतापर्यंत समोर ठेवलेत. मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे माहीत नाही. पण ते नेहमी त्यांना पाठीशी घालतात."
कदम यांच्या शिफारशीने शस्त्र परवाना मंजूर केला : पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी कोकणात जाऊन सांगितलं की, योगेश मी तुझ्या पाठीशी आहे. याच गुंडाचे पुण्यात खंडणी आणि इतर प्रकार सर्व सुरू असतात. गुंड निलेश घायवळच्या भावाला म्हणजे सचिन घायवळला योगेश कदम यांच्या शिफारशीने शस्त्र परवाना मंजूर केला. पुणे पोलिसांना डावलून थेट मंत्रालयीन स्तरावर त्यासाठी प्रयत्न झाले. शस्त्र परवाना घेण्यासाठी प्रोसेस असते, त्यातही पोलिसांत अर्ज करावा लागतो. पोलीस अर्जदाराची पार्श्वभूमी पाहतात, त्यांच्यावरील आरोप पाहतात. त्याच्या जीवाला धोका आहे का पाहतात? त्या अर्जदाराला समाजात एक स्थान असावे लागते.”
आरोप लिहून पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला होता : “सचिन हा निलेश घायवळचा सख्खा भाऊ आहे. पोलिसांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट लिहिले होते की तो गुंड आहे. त्याच्यावरील आरोप लिहून पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला होता. अर्धन्यायिक न्यायालयात गृहराज्यमंत्री यांच्याकडे पोलिसांनी सगळी बाजू मांडली होती. तरीही योगेश कदम जजमेंट देतात तो कसा सज्जन आहे. लाखो रुपये घेऊन त्याला परदेशात जायला परवानगी दिली आहे. अशा डागाळलेल्या माणसाला गृहराज्यमंत्री परवाना देतात,” असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
हेही वाचाः
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल आक्षेपार्ह 'एआय'-जनरेटेड व्हिडिओ; नवी मुंबईत गुन्हा दाखल
10 ऑक्टोबरला नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा, 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

