नंदुरबार : शहादा शहरातील विजयनगर परिसरात एका भंगार विक्रेत्याने इमानदारी दाखवली. दिवसभर फिरून तुटपुंजी कमाई करणाऱ्या भंगार विक्रेत्याला लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने रद्दीत सापडले. त्यानं स्वतःची परिस्थिती न पाहता इमानदारी दाखवत ते सोन्याचे दागिने मालकाला परत केले. यामुळे भंगार गोळा करणाऱ्या अमीन शेख यांचं कौतुक होत आहे.
दागिने परत मिळताच राजपूत परिवाराला झाले अश्रू अनावर : अमीन शेख शहरामध्ये भंगार गोळा करण्याचं काम करतात. विजयनगर परिसरात भंगार गोळा करत असताना अमीन शेख यांना एका ग्राहकाकडून घेतलेल्या रद्दीत सुमारे दहा लाख किंमत असलेले सोन्याचे दागिने आढळले. लाखो रुपयांचा ऐवज हातात आल्यानंतर एखाद्याचे इमान डगमगलं असतं. मात्र, हातावर पोट असणाऱ्या अमीन शेख यांनी प्रामाणिकपणा जपत राजपूत परिवाराला लाखोंचा ऐवज सुपूर्द केला. परिवाराला ऐवज परत मिळाल्यानंतर त्यांना आनंदाश्रू अनावर झाले.
भंगार विक्रेत्यांनं दाखवली इमानदारी : अमीन अय्युब शेख शहादा शहरात मागील अनेक वर्षांपासून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात. शहरभर फिरुन किरकोळ भंगार जमा करुन त्याची छानणी करत विक्रेत्याला विकून मिळणाऱ्या मोबदल्यात कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे हा त्यांचा नित्यक्रम. अमीन नेहमीप्रमाणे भंगार घेण्यासाठी फिरत असताना शहरातील विकास हायस्कूल जवळ राहणारे शिक्षक संजय राजपूत यांच्या घरी भंगार घेतलं. घरी गेल्यानंतर नेहमीप्रमाणं भंगाराची छानणी करताना त्यांना एका डब्यात सोन्याचे दागिने आढळले. भंगारात सोन्याचे दागिने आढळल्यानंतर त्यांनी राजपूत यांना संपर्क साधला. यानंतर अमीन यांनी ते दागिने संजय राजपूत यांचा मुलगा भूषण राजपूत आणि स्नूषा यांच्याकडं सुपुर्द केले. भंगार विक्रेत्याची इमानदारी पाहून राजपूत यांना अश्रू अनावर झाले. दागिने परत मिळाल्यानंतर राजपूत कुटुंबीयांनी अमीन यांच्या इमानदारीची प्रशंसा करत त्यांना मोबाईल भेट दिला. आजच्या युगात आणि स्वतःची परिस्थिती हालाखीची असताना त्यांनी इनामदारी दाखवून जगासमोर चांगले उदाहरण ठेवल्याचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा :
- हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही! लग्न समारंभात दिली जाते शपथ; नाशिकमध्ये कौतुकास्पद उपक्रम
- मुंबई उच्च न्यायालयाचा एमएमआरडीएला दणका, 1,169 कोटी रुपये देण्याचे आदेश, अनिल अंबानींच्या कंपनीला दिलासा
- 'सात जन्म हाच गुरू मिळू दे': तृतीयपंथीयांनी 'इथल्या' यल्लमा देवी, काळुबाई मंदिरात साजरी केली वटपौर्णिमा