अहिल्यानगर : जिल्ह्यातील काही भागांमध्ये 19 ते 23 मे 2025 दरम्यान गडगडाटासह वादळी वारा, वीज आणि अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागानं इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारपासूनच जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. आजसकाळ पासून प्रचंड उष्णता जाणवत असताना दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली.

अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट जारी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या हवामान बदलामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्यानं 22 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा, तर 23 मे रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून त्या दिवशी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.

नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन : प्रशासनानं नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आणि हवामान विभागाच्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं आहे. विजेच्या कडकडाटात झाडाखाली, टॉवर्सजवळ किंवा विद्युत उपकरणांजवळ थांबू नये. विजा चमकत असताना घरातच थांबावं. मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यावर बसून डोकं आणि कान झाकावेत. शेतकरी बांधवांसाठीही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसामुळे शेतीमालाचं नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षितस्थळी साठवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला माल झाकून ठेवावा. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं.

जिल्हा नियंत्रण कक्षाशी साधावा संपर्क : धरण आणि नदीक्षेत्रात जाणाऱ्यांनी प्रवाहात उतरू नये, तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं टाळावं. जोरदार वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्यानं त्या भागांपासून दूर राहावं. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्याशी खालील क्रमांकांवर संपर्क करता येईल, टोल फ्री क्रमांक 1077 दूरध्वनी 02412323844 , 02412356940 हवामान खात्याच्या सूचनांनुसार आज पासून पुढील पाच दिवस जिल्ह्यात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा :