नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढलेला पाहायला मिळतोय. उन्हाच्या या तीव्र लाटेमुळं उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नंदुरबार जिल्हा रुग्णालयात विशेष 'उष्माघात कक्ष' स्थापन करण्यात आलाय. या कक्षात उष्णतेच्या झळा बसलेल्या आणि उष्माघात ग्रस्त रुग्णांसाठी तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. सध्या उष्माघाताच्या कक्षात पाच बेड असून वातानुकूलित व्यवस्था करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दोन बेड आणि भविष्यात ग्रामपंचायत निहाय उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिलीय. तसंच आवश्यकतेप्रमाणे बेड वाढवण्यात येतील आणि जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात मुबलक आवश्यक साठा असल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांताराव सातपुते यांनी दिली.
तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध : विशेषत: शेतकरी, मजूर, बांधकाम कामगार तसंच उन्हात दीर्घकाळ राहणाऱ्या नागरिकांसाठी हा कक्ष उपयुक्त ठरणार आहे. उष्माघात हा गंभीर वैद्यकीय आपत्कालीन प्रकार असून वेळीच उपचार न मिळाल्यास तो प्राणघातक ठरु शकतो. त्यामुळं जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना सावध राहण्याचं आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. दरम्यान, मार्च ते जुलै या कालावधीत उष्माघाताचा धोका संभावतो. यामुळं या कालावधीत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात उष्माघाताचा त्रास एकाही रुग्णाला झाला नसला, तरी सतर्कता म्हणून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय.
उष्माघाताची लक्षणं : "तीव्र डोकेदुखी आणि भोवळ येणे, अंगात प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, उलट्या, मळमळ होणे, त्वचा गरम आणि कोरडी पडणे, रक्तदाब कमी होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे. तसंच बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता जवळच असलेल्या रुग्णालयात जाणं किंवा तात्पुरता वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे, "असं डॉ. कांताराव सातपुते यांनी सांगितलं.
अशी घ्या काळजी : "उष्माघात झालेल्या व्यक्तीला लगेच सावलीत किंवा थंड जागी न्यावं. तातडीनं थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर आणि शरीरावर ठेवाव्यात. भरपूर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळपाणी यांचं सेवन द्यावं. तापमान अधिक वाढल्यास आणि रुग्ण बेशुद्ध झाल्यास त्वरित रुग्णालयात हलवावं. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील उष्माघात कक्षात अशा रुग्णांना विशेष उपचार दिले जाणार आहेत. उन्हात बाहेर पडताना टोपी, गॉगल, हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत. शरीराला पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घ्यावी. ताक, नारळपाणी, लिंबूपाणी, फळांचा रस, सूप यांचं सेवन वाढवावं. १२ ते ३ वाजेदरम्यान जास्त उन्हात बाहेर पडणं टाळावं. उष्णतेमुळं त्रास होत असल्यास त्वरित सावलीत जाऊन पाणी प्यावं आणि विश्रांती घ्यावी," असं जिल्हाधिकारी मिताली सेठी म्हणाल्या.
हेही वाचा -