नागपूर- भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त आज नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायांतर्फे अभिवादन करण्यात येत आहे. सकाळपासूनच शेकडो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेत. यावेळी भीम अनुयायांनी महामानवाचा जयघोष केला. त्याचबरोबर विविध बौद्ध संघटनांसह समता सैनिक दलातर्फे अभिवादन करण्यात आलंय.
दीक्षाभूमीवर हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. आज सकाळपासून दीक्षाभूमीवर हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी पोहोचत आहेत. याशिवाय नागपूर शहरातील संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागपूरकर दाखल होत आहेत. आज सकाळी पवित्र दीक्षाभूमी परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आलंय.
दीक्षाभूमीचा इतिहास : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रेष्ठ मानवतावादी बुद्ध धर्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली. ज्या पवित्र ठिकाणी डॉ. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली होती. त्या जागेवर सुरुवातीला डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात आलेला होता. मात्र,ती जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची भावना आंबेडकरी अनुयायांची असल्याने ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने जोर धरत होती. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची 14 एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर 1978 साली स्तूपाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, संपूर्ण बांधकाम 2001 साली पूर्ण करण्यात आले.
दीक्षाभूमीवरील स्तूप वेगळा : दीक्षाभूमीवर मोठ्या स्तूपाची निर्मिती करण्यात आलीय. दीक्षाभूमीवर स्तूप प्राचीन सोपानपेक्षा फार वेगळे आहे. प्राचीन काळात सम्राट अशोकांनी अनेक स्तूप बांधले होते. ते सर्व स्तूप भरीव स्वरूपातील होते. मात्र, दीक्षाभूमीवर असलेला स्तूप आतून पोकळ आहे. स्तूपाच्या खालच्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश ठेवण्यात आलेला आहे, तर बाजूला गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आहे. त्याच्या शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास दर्शवणारे चित्र प्रदर्शन आहे.
बाबासाहेबांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा : मुंबईच्या चैत्यभूमी येथे जाणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील हजारो अनुयायी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येतात. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात पवित्र दीक्षाभूमीसह डॉ. बाबासाहेबांच्या अस्तित्वाच्या अनेक पाऊलखुणा आजही सुरक्षित आहेत.
हेही वाचा -