मनसेसोबतच्या युतीला ठाकरेंच्या माजी नगरसेवकांकडून ग्रीन सिग्नल; बैठकीत काय झाली चर्चा?
आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या माजी नगरसेवकांची मंगळवारी शिवसेना भवन येथे बैठक पार पडली.


Published : June 18, 2025 at 8:46 PM IST
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपली ताकद, मतांचं समीकरण, पक्षीय बलाबल याची चाचपणी करतानाचं चित्र आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी आणि आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या माजी नगरसेवकांची मंगळवारी शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत मनसेसोबत युती करायची की नाही? याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
युतीला नगरसेवकांचा ग्रीन सिग्नल : आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांचे बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसेसोबत युती करायची का? अशी थेट विचारणा उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना केली. त्यावेळी माजी नगरसेवकांकडून युतीबाबत ग्रीन सिग्नल आल्याचे सांगण्यात येते. युती केली तर त्याचा फायदाच होईल. मुंबईत युतीबाबत अनुकूल वातावरण आहे. युतीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुखांनी घ्यावा. तसंच पक्षप्रमुखांच्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करू आणि कामाला लागू. युती व्हावी ही मराठी माणसाची इच्छा असल्याचं देखील माजी नगरसेवकांनी बैठकीत म्हटलं आहे. दरम्यान, युती व्हावी ही मराठी माणसांची भावना आहे. त्याबाबत लोकांमध्ये ही चर्चा आहे. जर युती झाली तर मुंबईत नक्कीच परिवर्तन दिसेल, असं माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे.
मनसेसोबत युतीचा उद्या निर्णय होणार? : दरम्यान, "उद्या शिवसेनेचा 59 वर्धापन दिन आहे. गेल्या दीड-दोन महिन्यापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर चर्चांना उधाण आलं आहे. मराठी माणसासाठी दोन ठाकरे बंधूनी एकत्र यावं. ही मराठी लोकांची भावना आहे. त्यामुळं मनसे सोबतच्या युतीवर उद्या उद्धव ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडं साहेबांनी बैठीकत माजी नगरसेवकांच्या प्रगती पुस्तकाचा देखील आढावा घेतला. जे माजी नगरसेवकांना जायचे होते, ते गेले. ज्यांना थांबायचे होते ते थांबले. कोणाच्या निष्ठेवर जाणे चुकीचे आहे. आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. कोण फुटत आहे किंवा बाहेर जातंय, यासाठी नव्हे," अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

