मुंबई : लालपरी अर्थात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा केवळ ५६ टक्केच पगार झाला. यानंतर एसटी कर्मचारी आणि एसटी संघटनांनी आक्रमक होत, पगार नाही दिला तर आंदोलन करू असा इशारा दिला होता. दरम्यान, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत तातडीने मंत्रालयात वित्त सचिवांसोबत बैठक घेऊन एसटी महामंडळाच्या विविध सवलतीपोटी शासनाकडे थकीत असलेले १०७६ कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी १२० कोटी रुपये तातडीने मंजूर करुन घेतले आहेत.
मंगळवारी खात्यात पगार जमा होणार : मंत्री प्रताप सरनाईक यांनी वित्त विभागाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या उर्वरित पगारासाठी १२० कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. दरम्यान, सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळं बँका बंद आहेत. त्यामुळं मंगळवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात उर्वरित पगार जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोला दौऱ्यावर आहेत. येथे एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पगाराच्या प्रश्नावर मार्ग काढावा अशी विनंती केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी .गुप्ता यांच्याशी संपर्क साधून एसटी कर्मचाऱ्यांच्या उर्वरित पगारासाठी १२० कोटी रुपये तातडीने देण्याचे निर्देश दिले.
७ तारखेला पगार होईल : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि वित्त विभागाचे वित्त सचिव यांच्यात बैठक पार पडली. बैठकीत सचिवांनी एसटीच्या रखडलेल्या प्रश्नाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कर्मचाऱ्यांच्या उर्वरित पगारासाठी तातडीने १२० कोटी रुपये देण्याचे मान्य केले. यासंदर्भात शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. आता सलग तीन दिवस सुट्टृया असल्याने कर्मचाऱ्यांना उर्वरित पगार मंगळवारी खात्यात जमा होईल, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याचबरोबर, महामंडळाचे ९४६ कोटी रुपये तीन टप्प्यांमध्ये देण्याचे सुद्धा यावेळी अर्थ सचिवांनी मान्य केले आहे. तसेच, आगामी काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या ७ तारखेला निश्चित होईल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :