जळगाव : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विविध घडामोडी घडत असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या चार दिवसात सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांची घसरण झाली आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 97 हजार रुपये असून, चांदीचा दर प्रतिकिलो एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. डॉलरच्या दरात झालेली वाढ, तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात घडलेले सकारात्मक बदल विशेषतः भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीपासून बाजूला राहू लागला आहे. त्यामुळे मागणीतील घट आणि बाजारातील स्थैर्य यामुळे सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत.
नागरिकांचा सोनं खरेदी करण्याकडं कल : सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या चालू असलेला दर हा फायदेशीर ठरू शकतो. भविष्यातील वाढ लक्षात घेता अनेक नागरिकांनी सध्या सोनं खरेदी करण्याकडे कल दर्शवला आहे. चांदीच्याही दराने मोठी उडी घेतल्याने गुंतवणूकदारांसाठी हा एक महत्त्वाचा काळ आहे. “सध्याचा दर पाहता हा सोनं खरेदी करण्यासाठी अत्यंत योग्य काळ आहे. बाजारात सध्या स्थैर्य आहे, मात्र लग्नसराई जवळ येत असल्यानं आणि आगामी महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारातील संभाव्य उलथापालथीमुळे सोन्याचे दर पुन्हा एक लाख रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात,” असं तज्ज्ञानं यावेळी स्पष्ट केलं.
सराफा दुकानात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांची घट झाल्याने बाजारात एकच खळबळ उडाली आहे. या घसरणीचा फायदा घेण्यासाठी अनेक महिला ग्राहकांनी जळगावच्या सुवर्णनगरीतील विविध सराफा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली. सोन्याचे दर काही काळापासून चढ-उतार होत असल्याने गृहिणींच्या घरखर्चाच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. "मागच्या आठवड्यात सोनं एक लाखाच्या वर गेलेलं पाहून धक्का बसला होता. एवढ्या महागात कसं घेणार याच विचारात होतो. पण यावेळेस दर घसरल्यामुळे लगेच खरेदीचा निर्णय घेतला," असे ग्राहकानं सांगितले.
सोन्याच्या दरात अजून घट होण्याची शक्यता ? : दररोजच्या बाजारभावात होणाऱ्या बदलांमुळे गृहिणींच्या बजेटमध्ये गोंधळ होत आहे. गृहिणींच्या मते, दागिन्यांची आवड ही प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच. "जगात अशी एकही महिला सापडणार नाही जिने दागिन्यांकडे पाहून डोळे फिरवले असतील. आपल्याकडे सोनं असावं, दागिने असावेत अशी प्रत्येक महिलेला आस असते. दररोजच्या बाजारभावात होणाऱ्या बदलांमुळे गृहिणींच्या बजेटमध्ये गोंधळ निर्माण होतो. सोन्याचे दर स्थिर राहिले, तर आम्ही सुद्धा ठरवून वेळेवर खरेदी करू शकतो. आता दरात घट झाल्यामुळे काही प्रमाणात सुटकेचा निश्वास घेतला आहे," असं ग्राहक महिलेनं यावेळी सांगितलं. सराफा विक्रेत्यांचाही यावर प्रतिसाद आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे खरेदी वाढली आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर हे दर ग्राहकांसाठी चांगले संधी ठरत आहेत. सोन्याच्या दरात अजून घट झाली तर महिलांची खरेदी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सुवर्णबाजारात चैतन्य निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.