जळगाव : सोन्याचे दर लाखाच्या घरात पोहोचले असून सोन्याच्या दराने शुक्रवारी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आज सोन्याचे दर हे प्रति तोळा विक्रमी ९८ हजार २६२ रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून जळगाव सुवर्णनगरीमध्ये जीएसटी विना आज सोन्याचे दर प्रति तोळा ९५ हजार ४०० रुपये तर जीएसटीसह सोन्याचे दर प्रति तोळा ९८ हजार २६२ रुपयांवर पोहोचले आहेत.
सोन्याच्या दरात मोठी वाढ : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगभरात सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असून परिणामी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याने ग्राहकही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. तसेच सोनं खरेदी करण्यापेक्षा सोनं मोडण्याकडे अनेक ग्राहकांचा कल अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या ट्रेडमुळे सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक बाजारपेठेवर परिणाम : गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात तब्बल सात ते आठ हजार रुपयांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. आज सोन्याचा दर प्रति तोळा ९८ हजार पार तर चांदीचा दर प्रति किलो लाखाच्या पार गेला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफवॉरमुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असून चीनमधील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक सुरू केली आहे. तसेच भारतात लग्नसराई आणि सन उत्सव असल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे सातत्याने वाढत आहेत.
दर कमी व्हावेत, अशी ग्राहकांची मागणी : येत्या काळात चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफवॉर कमी झाले तर निश्चितच सोन्याचे दर काही प्रमाणात कमी होतील, असे देखील सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले आहे. सोन्याच्या दारात सातत्याने वाढ सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम हा ग्राहकांवर होत आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचे ऐन लग्नसराईमध्ये बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी व्हावेत, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
हेही वाचा :
- शेतकऱ्यांकडून काळ्या हळदीची लागवड; आयुर्वेदातही औषधासाठी काळ्या हळदीला विशेष महत्त्व; तीन लाखांचं उत्पन्न
- 'ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, तेच हिंदी भाषेचा विरोध करतात'; अजित पवारांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका
- हिंदी भाषेचं पालिका निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागेचं नाटक, संजय राऊतांचे सरकारवर शरसंधान