पुणे : तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे दीनानाथ रुग्णालय गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे. आज थकीत मिळकत कर प्रकरणी पुणे महापालिकेने दीनानाथ रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, "एखाद्या व्यक्तीने जर महानगरपालिकेचे पाच ते सात हजार रुपये टॅक्स भरला नाही तर ढोल वाजवत त्याच्याकडून टॅक्स वसूल केला जातो. पण २७ कोटी रुपये थकीत असलेल्या रुग्णालयाबाबत एकही शब्द काढला जात नाही. ४८ तासांच्या आधी आम्ही महापालिकेला इशारा दिला होता की, आपण कारवाई केली नाही तर आम्ही आक्रमक आंदोलन करू. पण उशिरा का होईना महापालिकेला देव पावला आणि त्यांनी रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे", असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुप्रिया सुळेंचं उपोषण : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्यात आले आहे. यावेळी दीनानाथ रुग्णालयासंदर्भात विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
चौकशी करून गुन्हा दाखल केला पाहिजे : तनिषा भिसेबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "तिची हत्या असून तिला त्रास होत असताना पाच तास ती रुग्णालयात उभी होती. हॉस्पिटलमध्ये सगळी तयारी करून तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्यात आलं, ही हत्याच आहे. याला डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत अॅक्शन घेतली असून याप्रकरणी कोणीही राजकारण केलेलं नाही आणि करणारही नाही. पण, याची चौकशी करून गुन्हा दाखल केला पाहिजे" असे मत देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
टॅरिफबाबत कमिटी तयार करून तज्ज्ञ लोकांशी बोललं पाहिजे : दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "मी कित्येक दिवसांपासून सांगत आहे की, एक कमिटी तयार करा. पण आज पहिल्यांदा वाणिज्य मंत्री हे स्टेक होल्डर यांच्याशी बोलणार आहेत. टॅरिफबाबत कमिटी तयार करून तज्ज्ञ लोकांशी बोललं पाहिजे", असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत विचारलं असता, सुप्रिया सुळे यांनी हात जोडून राम कृष्ण हरी एवढं म्हणून बोलणं टाळलं.
हेही वाचा :
- सोनं खरेदीपेक्षा मोडण्यासाठी ग्राहकांची गर्दी; सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण
- मुंबईतील नायर रुग्णालय ठरलं आंतरराष्ट्रीय पातळीवर 'सर्वोत्तम दंत रुग्णालय', अमेरिकास्थित 'पिएर फॉचर्ड अकॅडमी'तर्फे सन्मान
- भारतीय नौदलाची ताकद वाढणार; फ्रान्ससोबत मोठ्या संरक्षण कराराला मंजुरी, २६ राफेल मरीन फायटर जेट्स मिळणार!