छत्रपती संभाजीनगर : लिव्ह इन रिलेशनमध्ये असणाऱ्या प्रेयसीवर प्रियकराच्या भावांनीच चार वर्ष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वाळूज परिसरात उघड झाला आहे. विशेष म्हणजे लग्न न करता सोबत राहणाऱ्या या दाम्पत्याला दोन मुलं देखील आहेत. मात्र लहान मुलीवर वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केल्यानं पीडितीनं पोलिसात तक्रार देत प्रकरण उघडकीस आणलं. "या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांनी दिली.
प्रियकरासोबत राहत होती 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये : पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, ती आठवीत शिकत असताना एका मुलासोबत तिचं सूत जुळलं. काही दिवसांनी कुटुंबीयांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी 2010 मध्ये एका युवकासोबत पीडितेचा विवाह लाऊन दिला. ते वाळूज परिसरात जवळपास तीन वर्ष राहिले. मात्र पतीसोबत राहण्याची इच्छा नसल्यानं तिनं प्रियकरासोबत पळून जाणं पसंत केलं. त्यानंतर प्रियकरासोबत ती 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहू लागली. त्यात त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. सध्या मुलाचं वय 13 वर्षे तर मुलीचे वय 6 वर्षे आहे. सहा ते सात वर्ष ती प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिली. मात्र दरम्यान प्रियकराच्या तीन भावंडांनी वेगवेगळ्या वेळी तिच्यावर धाक दाखवत अत्याचार केल्याचा आरोप तिनं तक्रारीत नोंदवला.
चार जणांनी केला अत्याचार : काही वर्ष प्रियकरासोबत राहिल्यानंतर पीडिता काही वर्ष कुटुंबीयांसोबत एकत्रित देखील राहिली. त्यावेळी दोन भाऊ आणि चुलत भाऊ यांनी धाक दाखवत पीडितेवर अत्याचार केला. 2024 मध्ये मोठ्या दीरानं तिच्या लहान मुलीला जवळ घेत अश्लील चाळे केले. तिला वाचवायचं असेल तर माझ्यासोबत संबंध कर असा त्यानं धाक दाखवला. कुटुंबीयांना आणि नवऱ्याला सोडून इकडं आल्यानं कोणालाही अत्याचाराबाबत सांगू शकले नाही. लहान मुलीवर वाईट नजर टाकल्यानं अखेर तक्रार दिल्याचं पीडित महिलेनं सांगितलं. "वाळूज पोलीस ठाण्यात पीडितेनं तक्रार दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास करत आहोत," अशी माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाढे यांनी दिली.
हेही वाचा :