नंदुरबार : सध्या राज्यभरात जीबीएस अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम (guillain barre syndrome nandurbar) या आजाराचं थैमान सुरू आहे. पुण्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या आजाराचं लोण पसरलं आहे. मात्र, असं असतानाच नंदुरबारमधील एका 11 वर्षीय चिमुकलीनं 'जीबीएस'वर यशस्वी मात केली आहे. जवळपास दोन महिन्यांच्या उपचारानंतर अखेर आज (२४ मार्च) या चिमुकलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.
दीड महिना होती व्हेंटिलेटरवर : सातपुड्यातील दुर्गम भागातील हनुखांब अक्कलकुवा येथील सोनिया रवींद्र वसावे या चिमुकलीला २३ जानेवारी २०२५ रोजी अचानक अशक्तपणा जाणवू लागला. सुरुवातीला तीला चालता येत नव्हतं. मात्र, संध्याकाळपर्यंत तिची तब्येत अजूनच खराब झाली. तिला बसता आणि हात उचलताही येत नव्हतं. त्यामुळं तिला मोलगी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी दाखल करण्यात आलं. येथे तिची तपासणी केल्यानंतर तिला जीबीएस असल्याचं निदान झालं. त्यानंतर लगेचच तिला आयव्हीआयजीजी सुरू करण्यात आले. परंतु, आजार वेगानं वाढत गेला. त्यानंतर श्वसनासह स्नायूंना त्रास होऊ लागला. संध्याकाळपर्यंत मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. जवळपास दीड महिना ती व्हेंटिलेटरवर होती. मात्र, योग्य उपचारानंतर व्हेंटिलेटरचा आधार काढून टाकण्यात आला. १ आठवड्याआधी ट्रेकिओस्टोमी (गळ्यात छिद्र करुन श्वास नळीत ट्यूब टाकने) बंद करण्यात आली.
आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू : सुमारे दोन महिन्यांपेक्षा अधिक दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मुलीला सुखरुप बघून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दरम्यान, आई वडील परराज्यात ऊस तोडीसाठी गेले असताना शेजाऱ्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यामुळं मुलीच्या आई-वडिलांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती होती. आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. मात्र, "डॉक्टरांनी धीर दिल्यामुळं आम्ही आमची मुलगी जिवंत घरी घेऊन जात आहोत," असं ते म्हणाले.
हेही वाचा -