छत्रपती संभाजीनगर Ganeshotsav In Pakistan : गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) म्हटंल की, एक वेगळाच आनंद असतो. हा सोहळा देशातच नाही तर शेजारी असलेल्या मुस्लिम बहुल देशातही साजरा केला जातोय. स्वातंत्र्य पूर्व काळापासून सुरू झालेला हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आजही पार पडतोय. तिथे हिंदू पद्धतीने विधिवत पूजा-अर्चा केली जाते.
यांनी सुरू केला सोहळा : कोकणातून पाकिस्तान गेलेल्या दिवंगत कृष्णा नाईक यांनी हा सोहळा सुरू केला होता तो आजही कायम आहे. तिकडेही गणेश मंडळे असून मोठ्या मोठ्या मुर्त्यांची स्थापना केली जाते. तर बरेच मुस्लिम कुटुंबीय हिंदू सण पाहण्यासाठी जातात अशी माहिती, कराची येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते विशाल राजपूत यांनी 'ई टिव्ही भारत' दिली.
नाईक कुटुंबानं सुरू केला उत्सव : स्वातंत्र्यपूर्व कळात कोकण येथील रहिवासी दिवंगत कृष्णा नाईक हे त्यांच्या कुटुंबासह पाकिस्तानातील कराची येथे गेले होते. देश स्वतंत्र झाल्यावर फाळणी झाली. मात्र त्यांनी आपला प्रांत सोडला नाही आणि तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्यांनी त्या भागात गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील त्यांनी सुरू केलेला हा सोहळा आजही मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. त्यांचे पुत्र रमेश कृष्णा नाईक हे आता परंपरा पुढे घेऊन जात आहेत.
स्वतःच्या हातान घडवतात बाप्पाची मूर्ती : कराची येथील रत्नेश्वर महादेव मंदिरात गेल्या 35 वर्षांपासून बाप्पाची स्थापना करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. असं म्हणतात की, पार्वतीने स्वतःच्या शरीरातील निघालेल्या मळापासून गणपतीची मूर्ती साकारली होती. त्याच पद्धतीने नाईक कुटुंब चिनीमाती आणून स्वतःच्या हाताने मूर्ती घडवून त्याची विधिवत पूजा करतात. एक महिना आधीपासून तयारी सुरू होते. त्यानंतर विधिवत पद्धतीने पूजाअर्चा करून बाप्पाची मूर्ती साकारली जाते. गणेश चतुर्थीला वाजत गाजत या मूर्तीची स्थापना त्यांच्या घरी केली जाते. त्यानंतर रात्रभर जगराता साजरा केला जातो, तिथे असलेली हिंदू कुटुंब देवाचं नामस्मरण करून रात्र घालवतात. तर दीड दिवसानी या मूर्तीचं विसर्जन केलं जातं.
पाकिस्तानात आहेत गणेश मंडळे : पाकिस्तानाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात, तिथे हिंदूंना सण साजरा करण्यावर निर्बंध आहेत असं म्हटंल जातं. मात्र, तसं काहीही नसून आम्ही मोकळ्यापणाने गणेशोत्सव साजरा करतो अशी माहिती, तेथील सामाजिक कार्यकर्ते विशाल राजपूत यांनी दिली. येथे देखील भारताप्रमाणेच गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्र सत्संग परिवार आणि मराठी हिंदू सेवा संघ यांच्यावतीनं हा सोहळा साजरा केला जातो. बहुतांश कुटुंब दीड दिवसांचा गणपती स्थापित करतात, तर काही लोक पाच, तर काही नऊ दिवसाचा गणेशोत्सव साजरा करतात. येथे देखील मोठ-मोठी मंडळे असून मोठ्या आकाराचे बाप्पा तिथे बसवले जातात. गणेश उत्सवात मिरवणूक काढून आम्ही रस्त्यावर बाप्पाचा जयघोष करत वाजत गाजत सण साजरा करतो. येथील सरकार, जिल्हा प्रशासन आम्हाला त्यासाठी मदत करतात. हिंदू वस्तीत दिवाळी पेक्षाही गणेशोत्सवाला अधिक महत्त्व असल्याचं राजपूत यांनी सांगितलं.
मुस्लिम कुटुंब देखील सण पाहण्यासाठी येतात : पाकिस्तानमध्ये मराठी भाषिक कुटुंबीयांनी गणेशोत्सवची एक वेगळीच परंपरा सुरू केली आहे. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर विधिवत आरती केली जाते. रात्रभर जगराता साजरा करत भक्तीमय वातावरणात हा सोहळा साजरा केला जातो. इतकच नाही तर हिंदूंचा हा सोहळा पाहण्यासाठी पाकिस्तानमधील मुस्लिम कुटुंबीय येतात. ते देखील या कार्यक्रमांचा कौतुक करतात.
हेही वाचा -