मुंबई Lalbaugcha Raja : लालबागमधील प्रसिद्ध अशा गणेश गल्लीतील मुंबईचा राजाचे आणि तेजुकायाच्या राजाचं तसेच चिंचपोकळीचा चिंतामणी आणि काळाचौकीच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. विरार, वसई, बडोदा गुजरात, राजस्थान तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेश भाविक लालबागमधील गणपती बाप्पा आणि सजावट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
मौल्यवान वस्तूची चोरी : राजकारणी, सिने अभिनेते, अभिनेत्री यासारख्या व्हीव्हीआयपींची रेलचेल लालबाग परळमध्ये आहे. खास करून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी व्हीआयपी मंडळींबरोबरच सर्वसामान्य भाविक देखील मोठ्या संख्येनं हजेरी लावत आहेत. मात्र, आज गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी भाविकांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला आहे. लालबाग परिसरात अंधेरी येथून दर्शनासाठी आलेल्या आतिश शिंदे या तरुणाची अॅक्टिव्हा भारत माता जंक्शन येथे पार्क केलेली असताना, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चुकून शिंदे यांची चावी गाडीच्या लॉकला तशीच राहिली होती. ते सर्वजण गणपती बघण्यासाठी निघून गेले. त्यामुळं ही घटना घडली.
मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी : लोअर परेल येथून आलेल्या विघ्नेश मेका या तरुणाची रॉयल एनफिल्ड मोटरसायकल चिंचपोकळी येथील आनंद निवास बाहेर असलेल्या साने गुरुजी मार्गावरून चोरीस गेली. दोन्ही प्रकरणात संदर्भात काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मोबाईल चोरीच्या देखील जवळपास 40-50 घटना लालबाग परिसरात घडल्या आहेत. त्यामुळं नागरिकांना पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे की, गर्दीच्या ठिकाणी दर्शनासाठी जाताना शक्यतो नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.
हेही वाचा -