कोल्हापूर Ganeshotsav 2024 : जिल्ह्यात 5 दिवसाच्या गणपती बाप्पाला अतिशय भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत अनेक जण आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन (Ganpati Visarjan) करत होते. यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं 206 हून अधिक ठिकाणी 'कृत्रिम कुंड' बसवण्यात आली आहेत. मात्र, हिंदू परंपरेप्रमाणे आम्ही गणपती पंचगंगेच्या वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली.
नदी घाट विसर्जनासाठी केला खुला : गेल्या तीन ते चार वर्षांपासून पंचगंगा नदीमध्ये गणपती मूर्ती विसर्जन करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. परंतु बॅरिकेड तोडत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा घाट गणपती विसर्जनासाठी खुला केला. यावेळी पोलीस प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्यानं, परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नदीच्या प्रदूषणात वाढ : गेल्या काही वर्षात पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या पंचगंगेत विसर्जित केल्या तर आणखी प्रदूषणात वाढ होऊ शकते. त्यामुळं कोल्हापूर प्रशासनाने पंचगंगा नदीमध्ये गणपती मूर्ती विसर्जनावर बंदी घातली. ही बंदी गेल्या तीन ते चार वर्षापासून आहे. तर शहरातील सर्व गणेश मूर्ती हे इराणी खाण येथे विसर्जित करण्यात येतात. यासाठी संपूर्ण शहरात 'कृत्रिम कुंड' देखील उभारण्यात आले आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी कोणत्याही परिस्थितीत हिंदू परंपरेनुसार गणेश मूर्तीचं विसर्जन हे नदीच्या वाहत्या पाण्यातच करणार असा इशारा, हिंदुत्ववादी संघटनांकडून प्रशासनाला देण्यात आला होता.
पंचगंगा घाट परिसर बॅरिकेड लावून बंद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा देखील पंचगंगा घाट परिसर बॅरिकेड लावून बंद केला होता. मात्र, सकाळपासूनच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी 'पंचगंगा घाट' गणपती विसर्जनासाठी खुला करावा अशी मागणी पोलीस आणि प्रशासनाकडं केली. शिवाय सायंकाळी चार वाजेपर्यंत सदरचा घाट खुला करावा असा इशाराही यावेळी देण्यात आला. मात्र, प्रशासनाने हा घाट खुला न केल्यानं आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास बॅरिकेड तोडत पंचगंगा घाट गणपती मूर्ती विसर्जनासाठी खुला केला.
गेली दोन ते तीन वर्षात प्रदूषण का कमी झालं नाही : पंचगंगा नदीमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गणेश मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पंचगंगा नदीत वाढत असलेल्या प्रदूषणाचं कारण देत घालण्यात आली होती. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेत पंचगंगेचं प्रदूषण हे केवळ गणेश मूर्तींमुळंच होतं का? असा सवाल प्रशासनाला विचारला आहे. याशिवाय पंचगंगेच्या प्रदूषण कमी करण्यात प्रशासनाला अपयश येतय. याउलट दिवसेंदिवस प्रदूषणात वाढच होत गेली आहे. शहरातील सर्व नाले नदीत येऊन मिसळतात. याशिवाय साखर कारखान्याचे केमिकलयुक्त पाणी नदीत मिसळते, याकडं प्रशासनाचं लक्ष जात नाही का? असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विचारला.
हेही वाचा -
- तब्बल 50 हजार 1 बटनाची गणेश मूर्ती; हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाची मनमोहक सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी - Ganeshotsav 2024
- राजर्षी शाहूंचा कृतिशील वारसा, गेली 55 वर्ष कोल्हापुरातील 'या' मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान मुस्लीम कुटुंबाकडे - Shahu mandal story
- गणेशोत्सव २०२४ : पिंपळाच्या खोडात "सृष्टीविनायक"; अमरावतीच्या श्रीकृष्ण पेठेत गणरायाचं अनोखं रूप - Srishtivinayak