अहिल्यानगर- सध्या भीषण कडक उन्हाळा सुरू झाला असून, संगमनेर तालुक्यात पाणीटंचाई भासत आहे. तर दुसरीकडे जंगलांमध्ये वन्यप्राण्यांनाही पिण्यासाठी पाणी राहिलेले नाही. अशा कठीण परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील वनरक्षक हरिश्चंद्र जोजार हे खऱ्याअर्थाने वन्यप्राण्यांसाठी देवदूत ठरलेत. त्यांनी वन्यप्राण्यांसाठी 12 कृत्रिम पाणवठे तयार केले असून, टँकरद्वारे पाणी सोडलंय. गेल्या सहा वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत.
फेब्रुवारी महिन्यातच सिमेंटचे चार गोल कृत्रिम पाणवठे तयार : हरिश्चंद्र जोजार हे वनरक्षक म्हणून काम करीत आहेत. पानोडीसह परिसरातील खरशिंदे, खळी या भागातील जंगलांमध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी राहिलेले नाही. म्हणून त्यांनी फेब्रुवारी महिन्यातच सिमेंटचे चार गोल कृत्रिम पाणवठे तयार केलेत. याचबरोबर सिमेंटच्या आठ गव्हाणीदेखील तयार केल्यात. हे सर्व कृत्रिम पाणवठे तयार झाल्यानंतर त्यांनी टँकरचे पाणी आणून या सर्व कृत्रिम पाणवठ्यांमध्ये सोडलंय. यामुळे आता हमखास वन्यप्राण्यांची तहान भागणार आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून वनरक्षक जोजार हे हा उपक्रम राबवत आहेत. सध्या भीषण कडक उन्हाळा सुरू झाला आहे. पाणी आणि भक्ष्यासाठी वन्यप्राणी हे जंगलांमधून थेट मानवी वस्त्यांकडे कूच करीत आहेत.
वन्यप्राण्यांसाठी राबवलेल्या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक : यामुळे कधी कधी हे वन्यप्राणी नागरिकांवरदेखील हल्ले करीत आहेत. जोजार यांनी वन्यप्राण्यांसाठी राबवलेल्या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. दरम्यान हे कृत्रिम पाणवठे तयार करून 15 ते 16 दिवसांचा कालावधीदेखील झालाय. वन्यप्राण्यांचे पाण्यावाचून हाल होऊ नये म्हणून जोजार यांनी लगेच टँकरच्या माध्यमातून सर्व कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी साठवले आहे. दरम्यान बिबटे, तरस, मोर, लांडगे आदी वन्य प्राणी या परिसरात आढळत आहे. विशेष बाब म्हणजे रात्रीच्या वेळी हे वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांवर येत असतात. यासाठी भाग तीनचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे आणि वनपाल कोंडिबा इरकर यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. गेल्या सहा वर्षांपासून कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम जोजार हे राबवत आहेत.
सहा वर्षांपासून कृत्रिम पाणवठ्यांचा उपक्रम : ज्या पद्धतीने माणसांना तहान लागते, त्याच पद्धतीने वन्यप्राण्यांना देखील तहान लागते. म्हणून गेल्या सहा वर्षांपासून आपण हा कृत्रिम पाणवठ्यांचा उपक्रम राबवत आलोय. यामुळे वन्यप्राण्यांची देखील तहान भागत आहे. जोपर्यंत कडक उन्हाळा सुरू आहे, तोपर्यंत आम्ही हा उपक्रम सुरू ठेवत असतो. वरील वन्यप्राण्यांबरोबरच पशु-पक्षीही मोठ्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी येत असतात. यासाठी वरिष्ठांचे देखील सहकार्य मिळत असल्याच वनरक्षक हरिश्चंद्र जोजार यांनी सांगितलंय.
हेही वाचाः
"माणिकराव कोकाटेंना मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे", शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका