अहिल्यानगर (राहाता) : राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक परिसरात बिबटे कमी होण्याचे काही नाव घेईनात. आता तर कमाल झाली कारण अवघ्या सहा दिवसांपूर्वी येथे या एकाच परिसरात जेरबंद झालेला पाचवा बिबट्या पिंजरा तोडून पळाल्याची घटना ताजी असतानाच आठवडाभराच्या आत शुक्रवारी रात्री सहावा बिबट्या त्याचठिकाणी पिंजऱ्यात अडकला. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत एकाच शिवारात एवढे बिबटे जेरबंद झाले, हे एक रेकॉर्डच झालं असंच म्हणावं लागेल. यावरून कोल्हारमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ किती मोठ्या प्रमाणात आहे याची कल्पना निश्चितच येते.
बिबट्यांचा धुमाकूळ : पकडलेला पाचवा बिबट्या पिंजरा तोडून पळाल्यानंतर कोल्हार बुद्रुक येथे नवाळे - निबे वस्तीजवळ कोळपकर यांच्या चिकूच्या बागेत पुन्हा पिंजरा ठेवण्यात आला. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सहावा बिबट्या जेरबंद झाला. डरकाळ्यांचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. पुन्हा बिबट्या पळून जाण्याची घटना घडू नये म्हणून तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
सहा बिबटे पकडले : रात्रीतूनच पिंजऱ्यातील बिबट्या घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली. बिबट्याला पाहण्यासाठी रात्री आजूबाजूच्या नागरिकांची गर्दी जमली होती. कोल्हार बुद्रुकच्या या एकाच परिसरात दीड महिन्याच्या कालावधीत एकापाठोपाठ सहा बिबटे पकडले जाण्याची ही दुर्मिळ घटना घडली. शिवाय अलीकडच्या काही दिवसांपूर्वी राजुरी रोडलगतच्या कापसे वस्तीवर दोन बिबट्यांच्या झुंजीत एक बिबट्या गतप्राण झाल्याची घटना घडली. यावरून बिबट्यांचा धुमाकूळ कोल्हार परिसरात किती मोठ्या प्रमाणात आहे हे वेगळे सांगायला नको.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे या भागातील रहिवासी आणि शेतकरी धास्तावले आहेत. रात्रीचे घराबाहेर पडणे तर सोडाच दिवसादेखील शेतामध्ये काम करणे आता भीतीदायक बनले आहे. बिबट्याची दहशत या भागात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. नेमक्या एकाच भागात एकापाठोपाठ एवढे बिबटे कसे पकडले जात आहेत? याबद्दल विचारले असता वन विभागाकडे त्याचे समर्पक उत्तर नाही. या भागात बिबट्या पकडला गेल्यानंतर तो उचलायचा आणि नेऊन दुसरीकडे सोडायचा. पुन्हा रिकामा पिंजरा याठिकाणी ठेवायचा आणि पुढचा बिबट्या पकडण्याची वाट पाहायची. एवढेच फक्त हाती शिल्लक राहिले आहे.
दोन बिबट्यांचे वास्तव्य : एकाच ठिकाणी बिबट्यांची एवढी प्रचंड संख्या झाली आहे की त्यामुळे एक प्रकारची हातबलता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, हा सहावा बिबट्या पकडला गेल्यानंतरही आणखी दोन बिबट्यांचे वास्तव्य या परिसरात असल्याचे स्थानिक शेतकरी ठामपणे सांगत आहेत. एकापाठोपाठ बिबटे जेरबंद झाल्यानंतर त्यांची त्या परिसरातील संख्या कमी व्हायला पाहिजे. इथे मात्र तसे होताना दिसत नाही. बिबट्या पकडला गेल्यानंतरही पुन्हा याच भागात बिबट्यांचा संचार दृष्टीपथाच येतो, असं शेतकरी सांगतात.
हेही वाचा -