सातारा - पाच वर्षाच्या चिमुकलीची ओढणीनं गळा आवळून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना कराड तालुक्यातील वाठार गावात घडली आहे. संस्कृती रामचंद्र जाधव, असं मृत चिमुकलीचं नाव आहे. गुरूवारी (१० एप्रिल) सायंकाळपासून ती बेपत्ता झाली होती. पोलीस आणि ग्रामस्थांनी रात्रभर शोध घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटे तिचा मृतदेह शेतात सापडला. याप्रकरणी १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमागील नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.
रात्रभर शोध मोहीम, पहाटे सापडला मृतदेह - वाठार (ता. कराड) गावातील पाच वर्षाची संस्कृती अंगणात खेळत असताना गुरूवारी सायंकाळी अचानक बेपत्ता झाली. ही माहिती सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आली. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्यासह कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप यांनी वाठार गावातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. श्वान पथक आणि ड्रोनच्या साह्यानं पोलिसांनी रात्रभर चिमुकलीचा शोध घेतला. वाठार ग्रामस्थांनीही पोलिसांना मदत केली. अखेर पहाटे एका शेतात तिचा मृतदेह आढळून आला.
अल्पवयीन मुलीला पोलिसांनी घेतलं ताब्यात - बेपत्ता चिमुकलीसोबत अखेरच्या क्षणी असणाऱ्या १६ वर्षाच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिमुकलीची हत्या का केली? याबाबत ती पोलिसांना वेगवेगळी कारणे सांगत आहे. त्यामुळे पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? वेगळं काही कारण आहे का? याचाही तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.
मृतदेह पाहून पोलिसांना अश्रू आवर - शेतात आढळून आलेल्या चिमुकलीच्या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. घटनास्थळावरील ते चित्र पाहून पोलिसांना देखील अश्रू आवरता आले नाहीत. १६ वर्षाच्या मुलीनं अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याचं उघडकीस आल्यानं पोलिसांना धक्का बसला. याप्रकरणी पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत तपासाची चक्रे हालवली आणि एक खळबळजनक घटना उघडकीस आली.
हेही वाचा...