नंदुरबार : देशातील पहिल्या आधार कार्डधारक म्हणून कौतुक झालेल्या महिला रंजनाबाई सदाशिव सोनवणे (रा. टेंभली, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यामुळं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळालाय. भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांच्या हस्ते देशातील पहिलं आधार कार्ड स्वीकारण्याचा मान रंजनाबाई सोनवणे यांना मिळाला होता. योजनेपासून वंचित असलेल्या रंजनाबाई यांना लाभ मिळावा, यासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करून त्यांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. धनादेश मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलं.
नारी शक्ती दूत ॲपद्वारे केली तक्रार : रंजनाबाई यांनी सदर योजनेअंतर्गत 'नारी शक्ती दूत अॅप'च्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेमार्फत नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक व इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मात्र, योजनेची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचं निदर्शनास आलं. पुढील चौकशीत असं स्पष्ट झालं की, त्यांचं आधार कार्ड अंधेरी येथील आयडीबीआय बँकेशी संलग्न असून, त्यामुळे लाभाची रक्कम त्या खात्यात जमा झाली होती. यासंदर्भात बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेतील खात्यांची पडताळणी करण्यात आली. प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दीपक गिरासे यांच्या तालुकास्तरीय यंत्रणांनी योग्य कार्यवाही केली. परिणामी रंजनाबाई यांना आयडीबीआय बँकेकडून योजनेअंतर्गत लाभाचा १३ हजार ५०० रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या प्रक्रियेमुळं 'लाडकी बहीण योजने'चा लाभ प्रत्यक्षात मिळाल्यानं देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेचा सन्मान अधिक वृद्धिंगत झाला असून, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यामुळं ही एक प्रेरणादायी, आनंददायी बाब रंजनाताई सोनवणे यांच्या आयुष्यात घडली आहे.
वंचितांसाठी संपर्क क्रमांक जारी : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'पासून एकही लाभार्थी महिला वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी संपर्क क्रमांक (०२५६४-२१००४७) जारी केलाय. तसंच 'नारी शक्ती दूत ॲप'द्वारे देखील तक्रार करू शकतात, असं आवाहन जिल्हाधिकारी सेठी यांनी केलंय. रंजनाबाई यांच्या आधार व मोबाईल नंबरला चुकीचं बँक खात लिंक झालं होतं. त्यामुळं त्या योजनेचे पैसे मुंबईतील बँक खात्यात जमा झाले होते. त्याबाबतची पडताळणी करुन पुन्हा नव्यानं सर्व गोष्टी आधारला लिंक केल्या व आता त्यांना यापुढील लाभ बँक खात्यात जमा होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार पैसे : "'लाडकी बहीण योजना' सुरु झाल्यापासून याचा लाभ मला मिळावा यासाठी मी फिरत होते. बँकेचं केवायसी केलं, मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केला, तरीही मला या योजनेचे पैसे मिळाले नाहीत. नंतर असं कळलं की, माझे पैसे दुसऱ्या बँक खात्यात जमा झाले होते. नंतर त्या बँक मॅनेजरनं 13 हजार 500 रुपये माझ्या घराजवळील शाखेतील बँकेत पाठवले. त्याचा धनादेश मला देण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी मला मदत केली," असं सांगताना रंजनाबाई यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. रंजनाबाई यांचे हात, पाय आता थकले आहेत. या पैशातून एखादा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. तसंच मुलांच्या शिक्षणासाठीही हे पैसे वापरणार असल्याचं रंजनाबाई यांनी सांगितलं.
हेही वाचा -