इंदूर/महू- ऑपरेशन सिंदूरची पत्रकार परिषदेत माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणं मध्य प्रदेशचे आदिवासी व्यवहार मंत्री विजय शाह यांना भोवलं आहे. जबलपूर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी रात्री ११ वाजता महू येथील मानपूर पोलीस ठाण्यात बेलगाम वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
इंदूरपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या महू येथील एका कार्यक्रमादरम्यान मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या वक्तव्याची जबलपूर उच्च न्यायालयानं दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलं होतं.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असे असले तरी मंत्री विजय शाह यांनी कार्यक्रमात बोलताना कर्नल सोफिया कुरेशी यांचं थेट नाव न घेता, त्यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटलं. मोदीजी समाजासाठी जगत आहेत. आमच्या मुलींचे सिंदूर कोणी काढले? त्या लोकांना मारण्यासाठी आम्ही त्यांच्या बहिणीला पाठवून मारले. एक प्रकारे मंत्र्यांनी कोणाचंही नाव न घेता सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटलं. मंत्री विजय शाह यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका करण्यात आली.
मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश- मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर या गंभीर प्रकाराची जबलपूर उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली. न्यायालयानं मध्य प्रदेशच्या डीजीपींना मंत्र्याविरोधात चार तासांच्या आत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार मानपूर पोलिसांनी मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.
मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी- मंत्र्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याची पुष्टी डीआयजी निमिश अग्रवाल यांनी केली आहे. काँग्रेसनं भोपाळमधील श्यामला हिल्स येथील मंत्री विजय शाहा यांच्या बंगल्यावरील नावाच्या पाटीला बुधवारी काळे फासले. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
टीका होताच मागितली माफी- टीका होत असल्यानं मंत्री विजय शाह यांनी माफीही मागितली. त्यांनी म्हटलं, महिलांचे सिंदूर काढणाऱ्यांना पंतप्रधानांनी त्याच पद्धतीनं उत्तर दिलं आहे. माझे भाषण चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी लोकांना कपडे काढून त्यांचा धर्म विचारून मारल्यानं मला खूप दुःख झाले. जर माझ्या तोंडून दु:खाच्या भावनेत असताना काही चुकीचं निघाले असेल तर मी १० वेळा माफी मागतो. मी कर्नल सोफिया यांच्याबद्दल काहीही चुकीचे विचारही करू शकत नाही. त्या माझ्यासाठी स्वतःच्या बहिणीपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांनी राष्ट्राचा अभिमान वाढवला आहे. मी सोफिया कुरेशी यांना सलाम करतो.
सोफिया माझी बहीण आहे. पण त्याआधी ती संपूर्ण देशाची मुलगी आहे. मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी दिलेल्या विधानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दखल घ्यावी- सोफिया कुरेशीचे भाऊ बंटी सुलेमान
कोण आहेत सोफिया कुरेशी ? पत्रकार परिषदेतून कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला होता. १९९९ मध्ये कमिशन्ड ऑफिसर असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी दोन दशकांहून अधिक काळ भारतीय सैन्यात सेवा केली आहे. २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत काम केलं आहे. त्यांचे आजोबादेखील सैन्यदलात अधिकारी होते. त्यांचे पती कर्नल ताजुद्दीन हेदेखील सैन्यदलात अधिकारी आहेत. त्यांचं कुटुंब मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्याच्या नौगाव येथे राहत होते.
हेही वाचा-