विदर्भातल्या शेतकऱ्यानं केली संत्री पिकात क्रांती, एआयच्या मदतीनं एका झाडाला लागतायत १५०० फळं
विदर्भातील शेतकऱ्यानं संत्री पिकात क्रांती केली असल्याचं दिसून येत आहे. या प्रगतशील शेतकऱ्यानं एआयच्या मदतीनं संत्र्याचं भरघोस उत्पन्न काढलं आहे.

Published : June 9, 2025 at 12:54 PM IST
|Updated : June 9, 2025 at 2:28 PM IST
अमरावती - संत्र्याच्या झाडाला रोज पाणी किती हवं? खतांची खरंच गरज आहे का? झाडावर किंवा फळाला कीड लागलीय का? अशी सर्व माहिती मोबाईल फोनवर मिळत असेल आणि सकाळी उठल्यावर अवघ्या १५ मिनिटात आपल्या संत्रा बागेची संपूर्ण माहिती घेऊन संत्रा उत्पादक शेतकरी नियोजन आखत असेल तर आश्चर्य वाटायला नको. कारण हे सारं आता "एआय" अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे शक्य झालंय.
अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात खरपी या छोट्याशा गावात विजय बिजवे यांच्या शेतात या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कधी नव्हे इतका संत्रा बहरलाय. एका झाडावर १००० ते १५०० फळं आता विपरीत परिस्थितीतही लागलेली आहेत. हे तंत्रज्ञान शेतीसाठी वरदान ठरलंय, भविष्यात विदर्भातील संत्र्यांची गोडी आणखी वाढवणार, अशी आशा निर्माण झाली आहे. संत्रा बागेत हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं? यामुळं फायदा कसा होतोय? याबाबत ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट.
उपग्रह प्रणालीद्वारे पिकांचं निरीक्षण - विजय बिजवे यांच्या शेतात इंटरनेट प्रणालीवर चालणारं सेन्सर उभारण्यात आलंय. या सेन्सरद्वारे उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून संपूर्ण ८ एकर शेतात लागलेल्या संत्रा पिकाचं निरीक्षण केलं जातय. विशेष म्हणजे, शेतातील १२०० झाडांचं संपूर्ण व्यवस्थापन या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. झाडावर आणि फळांवर येणाऱ्या किडीचं व्यवस्थापनसुद्धा या तंत्रज्ञानामुळं शक्य झालय. या शेतात ओलावा किती? हे सांगणारं सेन्सर लावण्यात आलय. याद्वारे जमिनीचं तापमान आणि जमिनीचा ओलावा कळतो. या सेन्सरवर सोलर पॅनल लावलं असल्यानं वातावरणातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता कळते, अशी माहिती या तंत्रज्ञानातील नाशिक येथील एआय आणि कृषीतज्ञ डॉ. भूषण गोसावी यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.
स्मार्ट इरिगेशन शेड्यूल - संत्रा पिकाला योग्य इरिगेशनची गरज आहे. या तंत्रज्ञानाद्वारे बिजवे यांच्या शेतात खास स्मार्ट इरिगेशन शेड्युल आखून देण्यात आलंय. शेतात पाणी किती उपलब्ध आहे? पिकांच्या अवस्थेनुसार आणि मातीच्या प्रकारानुसार एखाद्या पिकाला पाण्याची किती गरज आहे या बाबतची माहिती या तंत्रज्ञानाद्वारे आपल्या मोबाईल ऍपमध्ये कळते. याठिकाणी स्मार्ट इरिगेशन शेड्युल लावण्यात आलं. त्यामुळं जमिनीत उपलब्ध असणारी खतं किती आहेत आणि ती कशी आहेत याची माहिती उपग्रहाच्या माध्यमातून कळते. यामुळं मातीची नेमकी कशी अवस्था आहे, हेही लक्षात येतं. मातीमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यांचं प्रमाणही कळतं आणि कोणते घटक जमिनीत कमी आहेत? हे लक्षात येतं असंही डॉ. भूषण गोसावींनी सांगितलं.
असा होतोय फायदा - बिजवे यांच्या शेतात पूर्णतः विषमुक्त संत्री आहेत. विशेष म्हणजे, बिजवे यांच्या शेतातून 15 किलोमीटरच्या परिसरात कोणाच्याही शेतात संत्री सेट झाली नाहीत. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं आमची 50 ते 60 टक्के पाण्याची बचत होते. यासह कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर अर्ध्यावर आला. सकाळी केवळ 15 मिनिटं मोबाईल फोनवर शेतीची संपूर्ण परिस्थिती मला घरबसल्या कळते. मोबाईल फोनवर पाहताना कुठे काही त्रुटी आढळ्यास मी घरूनच शेतातील गड्याला काय कुठे सुधारणा करायची, हे संगतो. या तंत्रज्ञानामुळं वेळेची, पैशांची मोठी बचत होत आहे. केवळ 60 हजार रुपये खर्चातून आम्ही हे तंत्रज्ञान आमच्या शेतात वापरत आहोत, असं गौरव बिजवे यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना सांगितलं.
15 वर्षांत पहिल्यांदा भरभराट- आमची 15 वर्षांपासून संत्र्याची बाग आहे. सतत नुकसान होत असताना यावर्षी मुलगा गौरव यानं आपल्या शेतात एआय तंत्रज्ञानाचा वापर करू असा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय खरंच योग्य ठरला असं आता शेतात फिरताना वाटतं. लगतच्या शेतात कुठंही संत्री दिसत नसताना आमच्या शेतात एका झाडाला 1000 ते 1500 फळं लागली आहेत. यावर्षी आमच्या उत्पन्नात निश्चित भर पडेल, असा विश्वास विजय बिजवे यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना व्यक्त केला.
संत्री उत्पादनात एआयचा वापर, देशातील पहिलाच प्रयोग - खरपी गावातील विजय बिजवे यांच्या शेतात सुरू असलेलं हे काम देशातील पहिलाच प्रयोग असल्याचंही डॉ. गोसावींनी सांगितलं. हा प्रयोग खरंच यशवी ठरणारा आहे? का याचा नेमका काय फायदा होतो आहे, याची माहिती घेण्यासाठी अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतून अनेक शेतकरी बिजवे यांच्या शेतात भेट देत आहेत. कृषी क्षेत्रातील तज्ञांची भेट देणाऱ्यांमध्ये संख्या अधिक आहे. हे तंत्रज्ञान नवं असून येणाऱ्या काळात शेतीच्या भरभराटीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते फायदेशीर ठरेल. अडचणीत सापडलेली विदर्भातील संत्री पुन्हा एआय तंत्रज्ञानामुळं जोमात बहरतील, असा विश्वास देखील डॉ. भूषण गोसावी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-

