छत्रपती संभाजीनगर : एखाद्या रुग्णाला तातडीनं ऊर्जा मिळावी, यासाठी मोसंबी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याच मोसंबीचं आगार म्हणून मराठवाड्याची ओळख मानली जाते. मात्र हीच ओळख नामशेष होईल, अशी भीती निर्माण झाली आहे. पाण्याची कमतरता आणि नवीन प्रयोग विकसित झाला नाही. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर उपाय नसल्यानं थेट बागांवर स्वतःच्या हातानं कुऱ्हाड चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडं केंद्र सरकारनं याच विषयावर शेतकऱ्यांचा स्पेन दौरा केला. त्यात काही उपाययोजना करणं शक्य आहे, मात्र त्या भारतात कधी होतील, हा प्रश्न आहे.

मराठवाड्यात मोसंबी अडचणीत : मराठवाडा हे मोसंबीचं आगार समजलं जाते. विशेषतः पैठण सारख्या भागामध्ये हक्काचं पीक म्हणून त्याकडं पाहिलं जाते. मागील काही वर्षांपूर्वी अंदाजे 48 हजार हेक्टर शेतजमिनीवर मोसंबीची बाग होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि येणाऱ्या वेगवगेळ्या अडचणींमुळे हे क्षेत्रफळ कमी झालं आहे. अभ्यासकांनी आणि शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार, "सध्या 25 ते 30 हजार हेक्टर क्षेत्रफळावर मोसंबीची फळबाग तग धरून आहे. आगामी काळात यात आणखी घट होईल, अशी शक्यता आहे. सतत येणारे रोग, त्यात कमी असलेलं संशोधन, वाढणारी पाणी टंचाई, मिळणारा कमी दर, या सर्वांमुळे मोसंबी उत्पादन कमी झालं आहे."
अनेक गावांमध्ये मोसंबी होतेय कमी : पैठण तालुक्यात मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. वर्षोंवर्ष मेहनत करून फळबाग उत्पादक शेतकरी मोसंबीचे उत्पादन घेतात. मात्र काही वर्षात पर्जन्यमान कमी झाल्यानं फळबाग जगवणं अवघड झाल्यानं कष्टानं वाढवलेली झाडं स्वतःच्या हातानं तोडत आहेत. हे चित्र आहे, केकतजळगाव येथील. या गावातील शेतकरी अजिनाथ बडे या शेतकऱ्यानं 2016 मध्ये दोन एकर शेतात मोसंबीची बाग लावली. त्यामध्ये 350 झाडांची लागवड त्यांनी केली. मोसंबी येण्यासाठी जवळपास पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर हळूहळू मोसंबीचं उत्पन्न सुरू होते. पाच वर्षांनी मोसंबी आली, दोन वर्ष नफा कमी आला. आता उत्पन्न वाढेल, असं वाटत असताना पाऊस कमी झाला. सलग दोनवर्ष पाणी नसल्यानं आता मोसंबी जगवणं अवघड असल्याचं लक्षात येताच अजिनाथ यांनी स्वतःच्या हातानं झाडं तोडण्यास सुरुवात केली.
टँकरवर जगवली बाग : "केकतजळगाव गावातील 100 पेक्षा अधिक शेतकरी मोसंबी हे पीक घेतात. मात्र दोन वर्षात परिसरात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. सुरुवातील टँकरद्वारे पाणी आणून मोसंबी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र सलग दुसऱ्यावर्षी तीच स्थिती असल्यानं पैसे आणायचे कसे आणि मोसंबी जगेल का? असे अनेक प्रश्न असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं वाढवलेली झाडे स्वतः कापून दुसरे कमी पाण्यातील, फायदा देणारे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये तूर, डाळिंब, केशर आंबा यांचा समावेश आहे," अशी माहिती शेतकरी गणेश थोरे यांनी दिली.
योग्य दर मिळत नसल्यानं अडचण : "पहिले पाच वर्ष मोसंबीची झाडं वाढवण्यासाठी जास्त कष्ट लागत नाहीत. मात्र देखभाल दुरुस्तीसाठी एकरी 20 ते 25 हजारांचा खर्च येतो. काही वर्षात सतत येणारी रोगराई आणि कमी असणारं पाणी त्यामुळे मोठा परिणाम मोसंबी उत्पादनावर झाला आहे. त्यात येणाऱ्या फळांना योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी निराश झाला आहे. बाजारात इतर फळांची आवक वाढली आहे, त्यात पंजाबमधून मोसंबी सारख्या किन्नो या फळाची आवक वाढली आहे. त्याचा आकार, रंग चांगला असल्यानं त्याची मागणी वाढत असल्यानं त्याचाही काही प्रमाणात परिणाम होत असल्यानं, मोसंबीचं क्षेत्रफळ कमी झालं आहे. आगामी काळात आणखी दुष्परिणाम पाहण्यास मिळू शकतात," अशी शक्यता शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
मोसंबी असते गुणकारी : "आरोग्याच्या दृष्टीनं मोसंबी गुणकारी समजली जाते. एखादी व्यक्ती आजारी असल्यास त्यांना मोसंबी किंवा त्याचा रस घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मोसंबी आणि संत्रा या फळांमध्ये "व्हिटॅमिन सी" असते. मात्र मोसंबीमधील गुणकारी तत्वांमुळे ते अधिक आणि कमी वेळेत शरीरावर प्रभाव करते. शिवाय लवकर तरतरी निर्माण करते, मोसंबी हे इडलिंबू प्रकारात मोडते. शरीर ताजंतवानं करण्यासाठी मोसंबी अधिक प्रभावशाली आहे, त्यात पोटसाफ ठेवण्यासाठी गुणकारी आहे. त्यामुळे मोसंबी शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे," असं मत आहारतज्ज्ञ डॉ. मंगल ताठे यांनी व्यक्त केलं.
स्पेन इथं अभ्यास दौरा : महाराष्ट्रातील विदर्भाची संत्री आणि मराठवाड्यातील मोसंबी सर्वत्र प्रसिद्ध मानली जाते. मात्र निसर्गाच्या बदलांमुळे ही फळं अडचणीत सापडली आहेत. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत 32 शेतकऱ्यांनी स्पेन दौरा केला. तिथंही उष्णता किंवा वातावरण आल्यासारखंच आहे. मात्र तिथं कमी पाण्यात फळबाग जगण्याची पद्धती विकसित केल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. आपल्याकडं हेक्टरी 15 टन मोसंबी निघते, मात्र तिकडं एवढ्याच शेतात 70 टन पीक काढलं जाते. छत्रपती संभाजीनगर इथले विठ्ठल भोसले हे शेतकरी देखील या अभ्यासदौऱ्यात होते, त्यांनी तिकडच्या उत्पादनाचं हे वैशिष्ट सांगितलं.
स्पेन इथल्या पद्धतीची गरज : "मोसंबी किंवा संत्रा यांचं उत्पादन वाढवण्यासाठी स्पेन येथील पद्धतीचा देशात वापर करण्याची गरज आहे, असं मत अभ्यासदौरा केलेले विठ्ठल भोसले यांनी व्यक्त केलं. स्पेनमध्ये कायदे अधिक कडक आहेत, कुठलेही रोप शेतकऱ्यांना देताना त्याची चाचणी केली जाते. सुरुवातील एकच रोप वेगवगेळ्या मातीत लाऊन तपासलं जाते. तिकडचे शेतकरी खूप जागरूक आहेत, रोप लावताना जमिनीपासून थोड्या उंचीवर लावलं जाते. मल्चिंगचा वापर केला जातो, वेळोवेळी वेगवगेळ्या प्रकारे काम केलं जाते. रोप तयार करताना किमान दोन वर्षांचा कालावधी ते घेतात, ते करत असताना विशिष्ट प्रकारच्या कुंडीचा वापर केला जातो. रोप लावल्यावर त्यांना दोऱ्याच्या साह्यानं जमिनीकडं ओढून बांधलं जाते, जेणेकरून सर्वत्र चांगला सूर्यप्रकाश लागेल आणि नैसर्गिक पद्धतीनं वारं लागल्यानं झाडं चांगली वाढतील. अशा उपाय योजनांची कमी पाण्यातही झाडं जगवली जातात, परिणामी चांगली फळं मिळतात. हीच पद्धत आपल्याकडं राबवल्यास आपल्याकडील संत्रा मोसंबी जगवणं सोपं होईल," असा विश्वास विठ्ठल भोसले यांनी त्यांच्या कृषी विभागाचे अधिकारी यांनी घेतलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.
हेही वाचा :