वाशिम : जिल्ह्यातील कारंजा येथील प्रगतीनगरमध्ये आज दुपारी १२ वाजेदरम्यान शेतीचा वाद विकोपाला गेल्याने वडील गोपाल मोखळकर (वय अंदाजे ५५) यांनी आपला मुलगा अनिल मोखळकर (४०) याच्यावर चाकूने चार वार करून त्याची जागीच हत्या केली. यावेळी उपस्थित असलेल्या मृतकाच्या पत्नी शिल्पा मोखळकर जखमी झाली आहे.
गोपाल मोखळकर यांना अटक - शेती वाटपावरून गोपाल मोखळकर आणि त्यांचा मुलगा अनिल मोखळकर यांच्यात घरात चाललेला वाद आज टोकाला गेला. वडिलांच्या रागाचा कडेलोटास झाला. क्षुल्लक वादातून पेटलेले भांडण इतकं विक्राळ रूप घेईल, याची कल्पनाही कुटुंबीयांना नव्हती. पोलिसांनी गोपाल मोखळकर यांना अटक केली आहे. कारंजा पोलिसात बीएनएसच्या कलम १०३(१), ११८(१), ३(५) तसेच भा.दं.वि.च्या ३०२, ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणाचा पुढील तपास कारंजा पोलीस अधिकारी करीत आहेत.
क्षणभराचा राग आणि आयुष्यभराची शिक्षा - मृत अनिल मोखळकर हा जेसीबी चालक होता. कुटुंबात शेतीच्या जुन्या वादांवरून अनेकदा भांडणे व्हायची. आज सकाळी पुन्हा त्याच मुद्द्यावरून वडील गोपाल यांच्याशी वाद झाला. काही क्षणांत संतापाचा भडका उडाला आणि गोपाल मोखळकर यांनी अनिलवर चाकूने सपासप वार केले. त्यात अनिल जागीच ठार झाला. दरम्यान, भांडण सोडविण्यास आलेली पत्नी शिल्पा हिला चाकूचा घाव लागून ती जखमी झाली.
घर असावं शांततेचं मंदिर, पण... - मोखळकर कुटुंबात शेतीच्या मालकी हक्कावरून सतत वाद होत होते. घरात नेहमीच तणावाचं वातावरण असायचं. याच तणावाने एका बापाला टोकाचं पाऊल उचलायला लावलं, असं या गावात आता बोललं जातं आहे.
हेही वाचा...