नागपूर : ‘शालार्थ प्रणाली’त ५८० अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे सामील करत, नागपूर विभागात १०० कोटींच्या शासकीय निधीचा अपहार करण्यात आल्याची बाब समोर आली असून, याप्रकरणी अटकसत्र सुरू झालं आहे. नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकानंतर आणखी तीन जणांना अटक करण्यात आलं आहे. यामुळं शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. निलेश शंकरराव मेश्राम अधीक्षक वर्ग दोन शिक्षण अधिकारी कार्यालय माध्यमिक नागपूर, संजय शंकरराव दुधाळकर, शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर विभाग आणि सुरज पुंजाराम नाईक, वरिष्ठ लिपिक शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.
चौकशी समिती नेमण्याचे दिले आदेश : नागपूर विभागात शालार्थ प्रणालीमध्ये अपात्र शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे सामील करून, सुमारे १०० कोटीचं अपहार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी संबंधित १२ शिक्षण संस्थांचे पदाधिकारी आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तसेच या संदर्भातल्या चौकशीसाठी शिक्षण संचालक अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.
शिक्षक नसतानाही शालार्थ आयडी देण्याचा केला प्रताप : शालार्थ आयडी देण्याचे फक्त अधिकार शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे आहेत. शिक्षक नसतानाही शालार्थ आयडी देण्याचा प्रताप शिक्षण उपसंचालकाने केला. इतकेच नव्हे तर त्या शिक्षकाला मुख्याध्यापकपदी पदोन्नतीही दिली. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना शुक्रवारी गडचिरोली येथे अटक करुन, नागपूरला आण्यात आले होते.
वरून ते खालपर्यंत अनेकांचा सहभाग : शिक्षण विभागातील अटक आरोपीची संख्या पाच झाली आहे. विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्षाचे अहवालानुसार बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, त्यांना ही अटक होण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी भूमिगत बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात संभावित नावे असलेले शिक्षणाधिकारीसह अन्य अधिकारी भूमिगत झाले असून, नॉन रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे. तर काहींनी अटकेच्या भीतीने खाणं पिणं बंद केल्याचं समजतंय.
आरोपींना कुठलाही अनुभव नाही : अटक करण्यात आलेल्या पराग पुंडके शिक्षक म्हणून कार्याचा कुठलाही अनुभवचं नाही, ते मुख्याध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पात्र नाही. हे स्पष्ट माहित असूनही त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात मदत करणारे आणि नंतर वेतन काढून शासकीय तिजोरीला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या नागपूरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील आणखी तिघांना नागपूर पोलिसांनी अटक केली.
अटक आरोपींची संख्या ५ वर : बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणी आता अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे. यात नागपूर पोलिसांनी शिक्षण विभागाचे अधीक्षक वर्ग दोन निलेश मेश्राम, शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपिक सुरज नाईक या तिघांना अटक केली आहे. तिघांनी मुख्याध्यापक पदी पराग पुंडकेच्या बोगस प्रस्तावाला मान्यता देण्यामध्ये आधीच अटक असलेल्या शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना मदत केली होती. सर्व काही माहीत असूनही तिघांनी बोगस मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणी साथ दिली म्हणून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती, पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. दरम्यान पराग पुंडके यांच्या बोगस नियुक्ती प्रकरणासारखंच इतर 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्ती केल्या संदर्भातली एक तक्रार नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झाली असून सायबर सेल त्याचा तपास करत असल्याची माहिती राहुल मदने यांनी दिली.
हेही वाचा -